पुणे प्रतिनिधी 

पुणे शहरात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील अनेक भागात स्वॅब सेंटर सुरू करण्यात आले असून आंबेगाव खुर्द येथील स्वॅब सेंटरमध्ये आमची अगोदर टेस्ट करा, नाही तर आम्ही कोणाचीच करू देणार नाही असे म्हणत दोन नागरिकांनी राडा घातल्याचे घटना घडली आहे.

शिवानी श्रीकांत उगले आणि प्रीतम संजय बोंद्रे असे दोन्ही आरोपींचे नाव असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या वतीने ज्या नागरिकामध्ये करोनाची लक्षणे आहेत, त्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी अनेक ठिकाणी स्वॅब सेंटर सुरू केले आहे. असेच एक आंबेगाव बुद्रुक येथील लक्ष्मीबाई हजारे वसतिगृह येथे सुरू करण्यात आले आहे. आज सकाळपासून नागरिक करोना तपासणीसाठी आले होते. त्याच दरम्यान दुपारच्या सुमारास शिवानी श्रीकांत उगले आणि प्रीतम संजय बोंद्रे हे दोघे देखील तिथे तपासणीसाठी आले होते. ते दोघे पुढे येऊन, आमची अगोदर टेस्ट करा, नाही तर आम्ही कोणाचीच टेस्ट करू देणार नाही असे म्हणाले, त्यावर महापालिकेचे कर्मचारी म्हणाले की, सर्वांची तपासणी होणार आहे. लाईनमधील दोन आणि सामान्य नागरिक यांच्या लाईन मधील दोन अशा क्रमाने तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे आपण लाईनमध्ये थांबा थोडा वेळ लागेल असे सांगितले.

ज्यानंत आम्ही कोणाची टेस्ट होऊ देणार नाही, तुम्ही काय करता ते बघतो असे म्हणत दोघांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान टेबलवर असलेले साहित्य आणि काही नागरिकांचे घेतले स्वॅब देखील दोघांनी फेकून दिल्याची घटना घडली. यामुळे स्वॅब सेंटरमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करून संबधित गोंधळ घालणार्‍या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास करण्यात येत असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसानी सांगितले.