पु्ण्यात करोनानं थैमान घातलं असताना प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, कारागृहातील कैद्यांना करोनाची लागण होता कामा नये. यासाठी राज्यातील अनेक भागात तात्पुरत्या कारागृहात कैद्यांची रवानगी करण्यात आली आहे. मात्र, याचा फायदा घेत पुण्यात या कारागृहातून आज (गुरुवार) दोन करोनाबाधित कैदी फरार झाले आहेत.

पुण्यातील येरवडा कारागृहापासून काही अंतरावर असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहाचे रुपांतर तात्पुरत्या कारागृहात करण्यात आले आहे. या ठिकाणी ६०४ कैद्यांना ठेवण्यात आले आहे. यांपैकी दोघे जण करोनाबाधित आढळले असून आज रात्रीच्या सुमारास हे दोघे खिडकीतून बाहेर पडत पळून गेले आहेत. यापूर्वी देखील पुण्यात तात्पुरत्या कारागृहातून कैदी पळून जाण्याची घटना घडली आहे.

येरवडा पोलिसांच्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले वसतिगृह या तात्पुरत्या कारागृहातील एका इमारतीमध्ये करोनाबाधित कैद्यांवर उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी विशाल खरात (चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगार) तसेच अनिल विठ्ठल वेताळ (शिक्रापूर हद्दीतील गुन्हेगार) हे दोघे करोनाबाधित आढळल्याने त्यांच्यावर येथे उपचार सुरु होते. मात्र, आज रात्री एक वाजण्याच्या सुमारास हे दोघेही खोलीतील खिडकीतून पळून गेल्याची घटना घडली. ही घटना समजताच तात्काळ पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली.