रसायन घेऊन निघालेल्या टँकरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. जेजुरी-निरा रस्त्यावरील दौंडज िखडीजवळ शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर टँकरचालक पळून गेला.
मंगेश लक्ष्मण कदम (वय २३, रा. दौंडज) व सुरेखा नामदेव यादव (वय ४५, रा. माळशिरस ता. पुरंदर) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंडज गावच्या यात्रेसाठी मंगेशची आतेबहीण सुरेखा यादव या माळशिरसहून आल्या होत्या. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता मंगेश हा आतेबहिणीला घेऊन दुचाकीवरून माळशिरसकडे सोडण्यासाठी जात होता. त्यावेळी कदमवस्तीजवळ समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला ओलांडून पुढे जाताना टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. भरधाव वेगात असल्याने टँकरचालकाचा वाहनावरील ताबा सुटून तो उलटला. या अपघातात दुचाकीवरील दोघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. टँकरमधील रसायन बाहेर येऊ नये म्हणून जेजुरी पालिकेच्या अग्निशमन बंबाने पाणी मारण्यात आले. हवालदार श्रीरंग निगडे अधिक तपास करीत आहेत.
एस.टी. बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
रस्ता ओलांडून निघालेल्या दुचाकीला एसटी बसची धडक बसल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे-नगर रस्त्यावर न्हावराफाटा येथे शनिवारी सकाळी हा अपघात झाला. रमेश मेघा चव्हाण (वय ३५, रा. उंडवडी ता. दौंड)असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चव्हाण हे मोटारसायकलवर पुणे-नगर ओलांडून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसची त्यांना ठोकर बसली. त्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.