– कृष्णा पांचाळ

हिंजवडीत आयटी पार्कमध्ये चकचकीत आणि उंच अशा इमारतीमध्ये संगणक अभियंता म्हणून नोकरीची आशा बाळगणाऱ्या तरुणांनी चक्क चहाचा व्यवसाय थाटला आहे. अक्षय राऊत आणि संकेत चौगुले अशी उच्च शिक्षित आणि यशस्वी व्यवसायिक तरुणांची नावे आहेत. दोघे उच्च शिक्षित असून एकाने एम.बी.ए. तर दुसऱ्याने एम.सी.ए केले. मात्र सरकार दरबारी अनेक प्रयत्न करून नोकरी मिळाली नाही.
मात्र हताश न होता उच्च शिक्षणाचा योग्य वापर करत त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला. दिवसाला तब्बल १५ हजार रुपयांची कमाई ते चहाच्या व्यवसायातून करत आहेत. यामुळे त्यांनी आता यामध्येच भविष्य करण्याचं ठरवलं आहे.

अक्षय राऊत आणि संकेत चौगुले हे दोघे ही महाविद्यालयात एकत्रत आले. तिथे दोघांची ओळख झाली आणि काही दिवसांमध्येच दोघात घट्ट मैत्री जमली. पुण्यातील फत्तेचंद जैन महाविद्यालयात पदवी पूर्ण करून दोघांनी पिंपरी-चिंचवड मध्ये डी.वाय.पाटील इथं प्रवेश घेतला. २०१४ ला संकेत चौगुले यांनी एम.बी.ए पूर्ण केलं तर अक्षय राऊत ने एम.सी.ए केले.

नोकरीसाठी दोघे ही अथक प्रयत्न करत होते,उच्च शिक्षित असल्याने नक्की नोकरी लागणार ही त्यांची भाबडी आशा होती. परंतु नोकरी लागत नव्हती.मधल्या काळात संकेतने यूपीएससीची तयारी केली मात्र याचा काही फायदा झाला नाही.

अक्षय राऊतची परिस्थिती बेताची असल्याने त्याने शिक्षण घेत भाजी व्यवसाय सुरू केला होता. त्यामधून त्याचा शिक्षणाचा खर्च निघत होता. मात्र एवढं शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी लागत नसल्याने दोघे हताश झाले होते. नोकरीची आशा सोडून देऊन दोघांनी स्वप्नपूर्ती नावाने खाजगी शिकवणी सुरू केली. परंतु यात यश मिळत नसल्याने त्यांनी जाहिरात क्षेत्रात पाऊल टाकलं. या व्यवसायात देखील त्यांना यश पाहता आलं नाही. पुन्हा विचार बदलला आणि काहीतरी वेगळा व्यवसाय करायचा ठरवलं. दोघांची संमती झाली आणि चहाचा व्यवसाय करण्यावर शिक्का मोर्तब झाला.

नागरिकांना वेगळ्या चवीचा चहा द्यायचा अशी मानसिकता मनात बाळगून चहा तयार करण्याची चाचपणी सुरू केली, अनेक दिवस हा प्रयोग सुरूच होता. त्यानंतर अक्षयने मुबंई मध्ये जाऊन १५ दिवस चहा तयार करण्याचं विशेष प्रशिक्षण घेतले. दोघांनी चहाच्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. रत्ना अमृततुल्य नावाने ते चहाच्या व्यवसायात उतरले. अवघ्या काही दिवसातच ग्राहकांना त्यांनी आपलंसं करून घेतलं. चहाच्या गोडव्याची चव ग्राहकांच्या जिभेवर रेंगाळू लागली.

बघता बघता पहाटे पासून रात्री अकरा पर्यंत हे ग्राहक हॉटेल समोर उभे राहायला लागले.दिवसाला १५ हजार रुपये चहाच्या व्यवसायातुन दोघाना मिळत असून निव्वळ नफा ८ हजार रुपये होत आहे. त्यामुळे भविष्यात व्यवसायामध्येच वाढ करणार असल्याचे अक्षय आणि संकेत म्हणाले आहे.

सकाळी साडेसहा ते रात्री सव्वाअकरा पर्यंत चहाच हॉटेल सुरू असतं. सकाळी आणि रात्री अकरापर्यंत चार कामगार काम करतात. संकेत ग्राहकांशी संवादातून गोडवा साधतो तर अक्षय चहा बनवून देऊन त्यांच्या मनात घरोबा करतोय. आई आणि वडिलांनी दोघांना ही मोलाची साथ दिल्याचं ते सांगतात. शिक्षण घ्या पण नोकरी मिळाली नाही म्हणून चुकीचा पर्याय निवडू नका असा सल्ला त्यांनी तरुणाईला दिला आहे. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर भटकत आहे.त्यात उच्चशिक्षित तरुणांचा देखील समावेश आहे. शासनाने तरुणांसाठी नोकऱ्या निर्माण कराव्यात भविष्यात आवश्यक त्या गोष्टी करणे गरजेच आहे असं देखील अक्षय आणि संकेत म्हणाले.