पुणे शहरात महिलांचे दागिने हिसकावून पसार झालेल्या चोरटय़ांना गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने जेरबंद केले. साखळी चोरटय़ांनी गेल्या पाच महिन्यात साखळी चोरीचे चोवीस गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून मंगळसूत्र, सोनसाखळ्या असा साडेदहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
हैदर सलीम इराणी (वय १९) आणि समीर शब्बीर इराणी (वय १९, दोघे रा. लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या साखळी चोरटय़ांची नावे आहेत. साखळी चोरटय़ांकडून चोरलेले दागिने विकत घेणारा हॉटेलचालक रमेश संभाजी काळभोर (रा. कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इराणी हे सराईत चोरटे आहेत. दोघांनी गेल्या पाच महिन्यात पुणे शहरात विविध ठिकाणी महिलांचे दागिने हिसकावून नेले होते. मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम परिसरात दोघेजण दुचाकीवरून संशयास्पद फिरत होते. त्यावेळी पोलीस नाईक संतोष मोहिते यांनी त्यांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. तेथे सापळा रचण्यात आला. पोलिसांनी इराणी यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पुणे शहरात साखळीचोरीचे चोवीस गुन्हे केल्याची कबुली दिली.
चोरटे वापरत असलेली दुचाकी ठाणे जिल्ह्य़ातील मुंब्रा येथून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रॉपर्टी सेलच्या प्रभारी पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण, सहायक निरीक्षक संदीप जगताप, सहायक फौजदार अजिनाथ वाकसे, भालचंद्र बोरकर, संभाजी गायकवाड, संजय सुर्वे, सिद्धराम कोळी, अविनाश पवार, तुकाराम धुमाळ, जनार्दन केदार, संतोष मोहिते, विजय देशमुख, रुपाली चांदगुडे, यशवंत खंदारे, विजय देशमुख यांनी ही कारवाई केली.