करोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्याचबरोबर मृतांच्या आकड्यातही भर पडत आहे. पुण्यात आज दिवसभरात १४ जणांचा करोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यु झाला. मृतांमध्ये एका दोन महिन्याच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. दिवसभरात २५४ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णांची संख्या ९ हजार ३३६ इतकी झाली आहे.

राज्यात पहिला करोनाबाधित रुग्ण सापडलेल्या पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या दहा हजारांकडे सरकू लागली आहे. आज (१३ जून) दिवसभरात २५४ नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले. तर १४ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये एका दोन महिन्याचा बाळाचाही समावेश आहे. १४ मृत्यूबरोबर जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा ४३९ इतका झाला आहे. दरम्यान, १६३ रुग्ण करोनातून बरे झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. १६३ जणांसह जिल्ह्यात करोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींची संख्या ६ हजार ८७ इतकी झाली आहे.

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आढळले ३ हजारपेक्षा जास्त रुग्ण

राज्यात मागील तीन दिवसांपासून २४ तासांच्या कालावधीत करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण वाढलं आहे. आज (१३ जून) सलग तिसऱ्या दिवशी राज्यात ३ हजारांपेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आढळून आले. ३,४२७ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं असून, ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १,५५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ५१ हजार ३७९ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४९ हजार ३४६ करोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोना रुग्णांची महाराष्ट्रातली संख्या आता १ लाख ४ हजार ५६८ इतकी झाली आहे.