पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण वाढतच चालले आहे. बुधवारी सकाळी पाच बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारात आणखी तीन करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज दिवसभरात पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा ८वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांची संख्या १६ झाली आहे.

पुण्यात आज सकाळपासून पाच जणांचा करोनाने बळी घेतला आहे. सकाळापासून शहरातील नायडू रुग्णालयात -१, नोबेल रुग्णालयात – १ आणि ससून रुग्णालयात ३ अशी एकूण ५ जणांच्या मृत्यूची नोंद  झाली, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली होती. त्यानंतर दुपारी अडीजच्या सुमारास एकाचा मृत्यू झाला, तर संध्याकाळी आणखी २ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच पुण्यात सकाळपासून २५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आजवर शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १५४ वर पोहोचली आहे, अशी माहिती महापौर मुलधीर मोहोळ यांनी दिली.

पुणे शहरात आज अखेर १५६७ नागरिकांनी करोनाची तपासणी केली असून त्यापैकी १४१७ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. तर १५८ रुग्ण बाधित आढळले आहेत. तसेच या दरम्यान १७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर शहरात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याचे आरोग्य विभाग मार्फत सांगण्यात आलं आहे.