पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढताना दिसत असून शनिवारी दोन महिलांचा ‘स्वाइन फ्लू’मुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत ४९ जणांचा बळी गेला आहे.

महाराष्ट्रासह पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूने सध्या थैमान घातले आहे. या रोगाचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढत असून आज दोन महिलांचा यामुळे बळी गेला आहे. निगडी येथील ६३ वर्षीय महिलेवर १३ सप्टेंबर आणि आकुर्डीतील ५० वर्षीय महिलेवर ४ सप्टेंबरपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवडमधील स्वाइन फ्लूची धास्ती वाढतच चालली आहे. कारण, गेल्या १६ दिवसांत १२ जणांचा मृत्यू या आजारामुळे झाला आहे. दरम्यान, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात अतिदक्षता विभागात ३ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. ऑगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूने १० जणांचा मृत्यू झाला होता. सध्या २५ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आढळल्यानंतर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्ल्यूच्या गोळ्या घ्याव्यात, त्याचबरोबर प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्यविभाग आणि डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.