जुन्नर परिसरातल्या जंगलात वानराची शिकार करुन मित्रांसोबत पार्टी केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. वनविभागाने ही कारवाई केली असून भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ आसवले (वय-२९) आणि गणपत हिलम (वय-४०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची शिक्षा सुनावली. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

या दोघांनीही गलोलने दगड मारुन वानराची शिकार केली. त्यानंतर त्याच्या मांसाचे तुकडे आपसात वाटून पार्टी केली. ही माहिती समजल्यानंतर वन विभागाने या दोघांना अटक केली. वानराची शिकार केल्यास तीन वर्षे कैद व २५ हजार रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. या दोघांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने या दोघांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य वनरक्षक (प्रादेशिक) विवेक खांडेकर, जुन्नरचे उपवनसंरक्षक आर. जयरामेगौडा, सहा. वनरक्षक डी. वाय भुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.