पिंपरी-चिंचवड परिसरातील मंदिरामधील दान पेट्या पळवणाऱ्या दोन सख्या भावांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केलं आहे. त्यांच्यावर दानपेटी पळवून त्यातील पैसे लंपास केल्याचा गुन्हा दाखल होता. विशाल भालेराव आणि अजय भालेराव असे या सराईत आरोपी भावांची नावं आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरीमध्ये एका मंदिराची दान पेटी विशाल आणि अजय यांनी लंपास केली होती. अशाच प्रकारच्या चोऱ्या त्यांनी निगडी, चिखली, पिंपरी येथे देखील केल्या होत्या, त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होते. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे यांना हे दोन्ही सख्खे भाऊ भोसरी येथील गवळी माथा येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे धडक कारवाई करीत पोलिसांनी या दोघांना अटक केली.

दोघे आरोपी भाऊ हे दिवसाच्या वेळी मंदिरांची रेकी करायचे त्यानंतर संध्याकाळी चोरी करायचे. त्यांच्यावर मंदीरातील दानपेटी फोडण्यासह घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हेही दाखल आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

कामगिरी खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.