राज्यातील बहुचर्चित शिक्षक भरती प्रक्रियेत दोन हजार जागांची वाढ करण्यात आली आहे. आता १२ हजार एक जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने विनाअडथळा ही प्रक्रिया राबवणे शक्य होईल.

गेल्या नऊ वर्षांत राज्यात शिक्षण भरतीची प्रक्रिया राबवण्यात आलेली नसल्याने पात्रताधारकांची संख्या मोठी आहे. राज्य सरकारने सुरुवातीला दहा हजार एक जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा करत पवित्र संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली. आचारसंहितेपूर्वी भरती प्रक्रिया राबवण्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, उमेदवारांच्या तुलनेत जागांची संख्या कमी असल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जागा वाढवण्यासाठी बिंदूनामावली अद्ययावत करण्याचे काम सुरू ठेवले. त्यामुळे काही खासगी संस्थांतील जागाही उपलब्ध झाल्या. आता बारा हजार एक जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाईल.

इंग्रजी माध्यमांतील जागांसाठी उमेदवारांचे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजीत झाले असण्याची अट घालण्यात आली आहे. असे उमेदवार मिळणे कठीण असल्याने ही अट शिथिल करण्याची मागणी आहे. भरती प्रक्रियेत जागा वाढल्याचे स्वागत आहे. मात्र, पुढील टप्प्यांतील भरती प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने आताच प्रतीक्षा यादी तयार करावी, असे डीटीएड-बीएड स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर म्हणाले. ‘सध्याच्या भरती प्रक्रियेत दोन हजार जागा वाढल्याचा आनंद आहे. मात्र, या प्रक्रियेत १६ जिल्ह्य़ांची कपात करण्यात आली आहे. सुरुवातीपासून बिंदुनामावली सुविहित ठेवण्यात आली असती, स्थानिक स्वराज्य संस्थांतील मुख्याध्यापक पदोन्नती वेळेवर झाली असती, तर पदांची संख्या आणखी १० हजारांनी वाढली असती,’ असे पात्रताधारक विठ्ठल सरगर यांनी सांगितले.

एकूण १२ हजार एक जागांवर भरती होणार

आचारसंहितेपूर्वी जागांमध्ये वाढ करता आली हे महत्त्वाचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उमेदवारांची निवड थेट जाहीर केली जाईल. खासगी संस्थांमध्ये मुलाखती होणार असल्याने आता उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची संधी दिली जाईल. त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.

– विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त