पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक पाचमध्ये दोन तरुणांनी सोमवारी रात्री उशिरा मद्यपान करून गोंधळ घातल्याचा आणि वसतिगृहातील प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना त्रास दिल्याचा प्रकार समोर आला. विद्यापीठ प्रशासनाने या बाबत पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही विद्यार्थ्यांना समज देऊन सोडून दिले.

विद्यापीठ प्रशासनाकडून वसतिगृहात अवैधरीत्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे वसतिगृहातील काही रिकाम्या खोल्या कुलूपबंद करण्यात आल्या आहेत. असे असतानाही वसतिगृह क्रमांक पाचमध्ये दोन तरुण मद्यपान करून गोंधळ घालत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना वर्दी दिली. पोलिसांनी या दोन विद्यार्थ्यांना समज देऊन सोडून दिले. दरम्यान, संबंधित दोन विद्यार्थ्यांकडून त्रास देण्यात आलेल्या एका विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्याला रात्रीच आरोग्य केंद्रात दाखल करावे लागले.

‘सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. आता वसतिगृहात अवैधरीत्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतची मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल,’ असे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.

सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

मद्यपान करून गोंधळ घालणारे तरुण विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत की नाही, याची माहितीच विद्यापीठ प्रशासनाकडे नाही. संबंधित विद्यार्थी विद्यापीठात शिकणारे आहेत का, असल्यास पदवी, पदव्युत्तर, संशोधन या पैकी कोणत्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत, याची तपासणी विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता. मात्र, या प्रकारानंतर या ओळखपत्राचे काय झाले, विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.