पौड येथील संभवणे गाव परिसरात नदीत बुडून दोन तरुणी मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी घडली. त्यांच्यासोबत असलेल्या दोन तरुणी पाण्यातून बाहेर पडल्याने वाचल्या आहेत.
अश्विनी कांबळे (वय १८) आणि विनल गणेश सुरवसे (वय १६, दोघी रा. गाढवे कॉलनी, संगम चौक, कोथरूड)अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणींची नावे आहेत, तर रेखा भंडारी आणि स्नेहा सुरवसे या पाण्यातून बाहेर पडल्याने वाचल्या आहेत. कोथरूड परिसरात उमेश पाथरकर यांचे साडी विक्रीचे दुकान आहे. सोमवारी (२३ मे) दुकानाला सुट्टी असल्यामुळे चौघीजणी पौड परिसरात फिरायला गेल्या होत्या. लग्नसराईमुळे गेल्या महिन्यात सुट्टी न घेतल्याने पौड येथे सहलीला जाण्याचा बेत त्यांनी आखला होता. त्यांच्यासोबत दुकानाचे मालक पाथरकर आणि स्नेहा सुरवसे हिची लहान बहीण विनलदेखील होती.
सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अश्विनी, विनल, रेखा आणि स्नेहा या संभवणे गावातील मुळा नदीतील पाण्यात उतरल्या. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने अश्विनी आणि विनल गटांगळ्या खाऊ लागल्या. प्रसंगावधान राखत रेखा आणि स्नेहा या बाहेर पडल्या. मात्र, अश्विनी आणि विनल पाण्यात बुडाल्या. पाथरकर यांनी दोघींना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. त्यानंतर त्यांनी गावातील रहिवाशांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मंगळवारी सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे शोधमोहीम राबवून दोघींचे मृतदेह बाहेर काढले. अश्विनी आणि विनल यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची आहे. पाथरकर यांच्या साडी विक्रीच्या दुकानात काम करून त्या कुटुंबीयांना मदत करत होत्या. अश्विनी मूळची साताऱ्यातील आहे. काही वर्षांपूर्वी तिचे कुटुंबीय कोथरूड येथे राहायला आले होते, तर विनल हिचे वडील रिक्षाचालक आहेत.