शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. माउलींची पालखी आषाढी वारीसाठी सोमवारी पहाटे पुण्याकडे मार्गस्थ झाली. भोसरी फाट्याजवळ उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे, शिवसेनेच नेत आदेश बांदेकर आदी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माउलींच्या पादुकांची पूजा करण्यात आली. माजी आदिवासी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत पालखी मार्गावर फुगड्याही खेळल्या. खूप दिवसांपासून पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची माझी इच्छा होती. पालखी मार्गावरून चालण्याचे मनात होते. आज ती इच्छा काही प्रमाणात पूर्ण झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.
आषाढी वारीसाठी माउलींच्या पालखीचे रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आळंदीतील मंदिरातून प्रस्थान झाले. लाखो वैष्णवांचा मेळा माउलींना पंढरीकडे घेऊन जाण्यासाठी आळंदीमध्ये जमला आहे. त्यांच्यासोबत आणि अखंड टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीचा प्रस्थान सोहळा रंगला. रविवारी रात्री पालखीचा मुक्काम आजोळघरी म्हणजेच गांधीवाड्यात होता. सोमवारी पहाटे पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. सोमवारी आणि मंगळवारी पालखीचा मुक्काम पुण्यामध्येच असणार आहे.