राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिश्किल उत्तर दिले. गुरूवारी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात ‘कृषिक’ या प्रदर्शनाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की ‘पवार साहेब मला सुप्रिया ताईंनी विचारलं की तुमचं घड्याळाचं दुकान आहे का? मी म्हटलं दुकान नाही. मात्र, घड्याळवाले माझे पार्टनर आहेत.’ उद्वव ठाकरेंच्या या मिश्किल वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विकास केंद्र बारामती यांच्यातर्फे माळेगाव येथे भरविण्यात आलेल्या ‘कृषिक २०२०’ या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषिमंत्री दादा भुसे, प्रसिद्ध अभिनेते आमीर खान पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार आणि बारामती कृषी विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या बारामतीमधल्या कामाची मुक्तकंठानं प्रशंसा करत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वेळ जुळून यावी लागते. आता ती वेळ जुळून आली आहे. महाराष्ट्रात अगदी योग्य वेळी आपली सत्ता आली आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

ठाकरे म्हणाले,की मुंबई आणि इतर ठिकाणची अनेक कृषी प्रदर्शने मी पाहिली. पण, बारामतीचे हे कृषी प्रदर्शन पाहून मला समाधान वाटले. मी जर बारामतीला आलो नसतो तर चांगल्या कृषी प्रदर्शनाला मुकलो असतो. कुणालाही पाहून अभिमान वाटावे असेच हे कृषी प्रदर्शन आहे. नवीन शेती तंत्रज्ञान कार्य पद्धतीचा वापर करून शेती उत्पादन वाढीचे महत्त्व पटवून देण्यासाठी पवार कुटुंबीयांनी उत्तम कार्य केले आहे.