आम्ही वेगवेगळ्या पक्षांचे राजकारणी पक्षभेद विसरून मराठीच्या मुद्द्यावर वाद टाळून एकत्र येण्याचे तारतम्य दाखिवतो. हेच तारतम्य साहित्यिकांनी का दाखवू नये, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी साहित्यिकांना फटकारले. मराठी भाषेचा उत्सव आनंदाने साजरा करायचे सोडून कारण नसताना वाद रंगिवले गेले. त्या रंगाऱ्यांनी आपली डबडी घेऊन दुसरी भिंत पाहावी, अशी टिपणीही त्यांनी केली.
विविध पक्षांचे राजकारणी आणि माजी संमेलनाध्यक्षांच्या उपस्थितीत ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले. त्या प्रसंगी ठाकरे बोलत होते. वनमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे, लीला शिंदे, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. आनंद यादव, साहित्य महामंडळ अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, आमदार सुभाष देसाई, विजय शिवतारे, डॉ. नीलम गोऱ्हे, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, स्वागताध्यक्ष विजय कोलते, निमंत्रक रावसाहेब पवार, सासवडच्या नगराध्यक्षा नीलिमा चौखंडे आणि पुण्याचे उपमहापौर बंडू गायकवाड या वेळी उपस्थित होते.
देशातील सर्व जण आपल्या भाषेचा अभिमान बाळगतात. पण, आम्ही मराठीचा अभिमान बाळगला, तर आमच्यावर प्रांतीय आणि संकुचित म्हणून टीका होते. मराठी ही संतांची भाषा आहे. परंतु, जेव्हा ती पेटून उठते, तेव्हा वाघनखे बाहेर येतात हे  विसरू नये, असा इशारा ठाकरे यांनी दिला. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र असा बेळगावचा उल्लेख करून तेथील जनतेने आंदोलन, निवडणुकीतील विजय असा कोणताही मार्ग बाकी ठेवलेला नाही. तरीही त्यांच्यावर अत्याचार होत असल्याची टीका त्यांनी केली.
महाराष्ट्रामध्ये विदर्भ-मराठवाडा असा प्रांतवाद वाढीस लागल्याची खंत पतंगराव कदम यांनी व्यक्त केली. वाचनसंस्कृती वाढण्यासाठी ग्रामीण भागात अधिकाधिक संमेलने व्हावीत, अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
प्रबोधन प्राणावर बेतले
दाभोलकर यांच्या हत्येचा उल्लेख समारोपाच्या भाषणात करण्याचे ठरविले होते, असे फ. मुं. शिंदे यांनी सांगितले. युक्रांदच्या काळापासून दाभोलकर आपले मित्र असून प्रबोधन प्राणावर बेतेल अशी कल्पना कधी केली नव्हती. महाराष्ट्रामध्ये ही घटना घडणे क्लेशदायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पुढील संमेलनासाठी आठ निमंत्रणे
आगामी ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कल्याण, जव्हार (ठाणे), सातारा, चंद्रपूर, जालना, बडोदा, उस्मानाबाद आणि कणकवली अशी आठ निमंत्रणे आली आहेत, असे साहित्य महामंडळ अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. ३१ मार्चनंतर या विषयीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.