पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांतील अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला अशा बारा विद्याशाखांतील अभ्यासक्रमांचे आणि एम.फिल., पीएच.डी.चे दूरशिक्षण किंवा मुक्तशिक्षणाद्वारे प्रवेश देता येणार नाहीत, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्पष्ट केले आहे.

करोना विषाणू संसर्गामुळे देशभरातील जवळपास सर्व शिक्षण संकुले बंद आहेत. या पार्श्वभूमीवर यूजीसीने मुक्तशिक्षण किंवा दूरशिक्षणासाठी प्रतिबंधित अभ्यासक्रमांबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे संके तस्थळावर जाहीर के ली आहे. यूजीसीने २० टक्के  अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यास या पूर्वीच परवानगी दिली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांतील अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला अशा बारा विद्याशाखांतील अभ्यासक्रमांचे आणि एम.फिल., पीएच.डी.चे दूरशिक्षण किंवा मुक्तशिक्षणाद्वारे प्रवेश देता येणार नाहीत. खासगी शिकवणी संस्थांशी करार करून खासगी किंवा सार्वजनिक विद्यापीठांना त्यांचे अभ्यासक्रम मुक्तशिक्षण किंवा दूरशिक्षण पद्धतीने प्रवेश देऊन चालवता येणार नाही, असे यूजीसीने परिपत्रकात नमूद केले आहे. प्रत्येक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उच्च शिक्षण संस्थेच्या मुख्यालयामार्फत पारदर्शक पद्धतीनेच राबवावी. दूरशिक्षण किंवा मुक्तशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रवेश यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर आणि फेब्रुवारी-मार्चपासून राबवले जाणार आहेत. त्यात पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण आणि पदव्युत्तर पदवीसाठी पदवी उत्तीर्ण पात्रता आहे, असे यूजीसीने नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांनी खात्री करावी

उच्च शिक्षण संस्थांमध्ये दूरशिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी यूजीसीच्या संकेतस्थळावरून संबंधित शिक्षण संस्थेला दूरशिक्षण अभ्यासक्रम राबवण्यासाठीची संलग्नता असल्याची खात्री करावी, असे आवाहनही यूजीसीने केले आहे.