इंग्लंडमधून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या तीन जणांमध्ये अधिक प्रभावशाली असलेला करोना म्हणजे यूके स्ट्रेन आढळून आल्याचं समोर आलं आहे. या तिघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर, आणखी एका प्रवाशाचा तपासणी रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळे आता पिंपरीकरांची चिंता काहीशी वाढल्याचे दिसत आहे.

२६८ प्रवाशी इंग्लडमधून मुंबईमध्ये उतरले होते त्यांचा शोध महानगर पालिकेने घेतला. त्यापैकी संशयित सात जणांचे नमुने पुण्यातील NIV ला पाठविण्यात आले होते. यापैकी तिघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला व तीन जणा यूके स्ट्रेन करोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर,अद्याप एका प्रवाशाचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे.

आज  दिवसभरात १५० करोनाबाधितांची नोंद –

दरम्यान, आज पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १५० करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ९१ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९७ हजार ४४२ वर पोहचली असून, यापैकी ९३ हजार ९९७ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६३९ असल्याचीअशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे शहरात दिवसभरात ३८७ नवे करोनाबाधित, तीन रुग्णांचा मृत्यू –

पुणे शहरात दिवसभरात ३८७ नवे करोनाबाधित आढळले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ८० हजार ६७४ झाली आहे. तर, ४ हजार ६६३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान ३९३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आजअखेर शहरात एकूण १ लाख ७३ हजार ३३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.