सांगवी येथे पवना नदीच्या पात्रात भराव टाकून अनधिकृतपणे उभारलेल्या रेस्टॉरंटसह दोन गॅरेजवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने शनिवारी कारवाई केली. याखेरीज अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या न्यू मिलेनियम शाळेसह शहरातील ६६ हजार ५२३ बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
नदीपात्रामध्ये भराव टाकून उभारण्यात आलेल्या सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे न्यू मिलेनियम स्कूल तसेच रेस्टॉरंट आणि दोन गॅरेजच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यां जयश्री डांगे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आमदार लक्ष्मण जगताप हे या शाळेचे अध्यक्ष होते. राजकीय दबावामुळे शाळा, रेस्टॉरंट आणि गॅरेजवर महापालिका कारवाई करीत नसल्याचा आरोप श्रीमती डांगे यांनी या याचिकेमध्ये केला होता.
याचिकेवरील सुनावणीदरम्यान शहरामध्ये ६६ हजार ५२५ अवैध बांधकामे असून त्यांच्या नियमितीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित असल्याने शाळेवर कारवाई न केल्याचे शपथपत्र महापालिकेने न्यायालयात दाखल केले होते. त्यावर न्यायालयाने नदीपात्रात भराव टाकून उभारलेल्या बांधकामांसह शहरातील सर्व अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश ५ ऑक्टोबर रोजी दिले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून न्यू मिलेनियम शाळेवरील कारवाईसाठी ३१ मेपर्यंतची मुदत दिली आहे.
हाय पाइंट रेस्टॉरंट हॉटेल, साई कार सव्‍‌र्हिस गॅरेज, डीएसए मोटार गॅरेजवर महापालिकेने शनिवारी कारवाई करून १८ हजार चौरस फूट जागेवरील बांधकाम मोकळे केले. कार्यकारी अभियंता गुलाब दांगट, अपअभियंता शिरीष पोरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. क्रेन, दोन जेसीबी, तीन ट्रकचा वापर करण्यात आला. सांगवी पोलीस ठाण्याचे २५ कर्मचारी तैनात करण्यात होते.