सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात मंगळवारी आत्महत्या केलेला बालाजी मुंढे हा माजी विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहात अनधिकृतपणे राहात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विद्यापीठाच्या आवारात अनधिकृतपणे राहणाऱ्या (पॅरासाईट) विद्यार्थ्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे.विद्यापीठातील वसतिगृहांत अनधिकृतपणे राहणारे विद्यार्थी हा गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला विषय आहे. बालाजी याने मंगळवारी विद्यापीठाच्या आवारात आत्महत्या केली. बालाजी मूळचा नांदेडचा होता. तो शिकत असताना विद्यापीठाच्या वसतिगृहात राहात होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नेट-सेट आणि राज्यसेवा परीक्षेची तयारी करणारा बालाजी विद्यापीठाच्याच वसतिगृहात राहात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जयकर ग्रंथालयाच्या अभ्यासिकेतही त्याला पाहिले असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.विद्यापीठाच्या विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये राहण्यासाठी परवानगी असते. शिक्षण पूर्ण झाले तरी वर्षांनुवर्षे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणारे विद्यार्थीही आहेत. त्यात मुलींच्या तुलनेत मुलांचे प्रमाण जास्त आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये सध्या १ हजार ४०० विद्यार्थीच सामावू शकतात. मात्र, प्रत्यक्षात दीडपट विद्यार्थी हे जास्त असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दिवस अभ्यासिका, ग्रंथालये, महाविद्यालय अशा ठिकाणी काढून रात्री हे विद्यार्थी वसतिगृहावर राहतात. सुट्टय़ांमध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असते. वसतिगृहात मित्राला भेटायला म्हणून गेलेला विद्यार्थी ठरावीक वेळानंतर बाहेर पडतो का याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जात नाही. त्याचप्रमाणे वर्षभरात एखाद वेळी अनधिकृत विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाते. मात्र, त्यात सातत्य नसल्यामुळे कारवाई झाली की पुढील आठवडय़ात वसतिगृहाची परिस्थिती पूर्वपदावर येते.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी अधिक

पुणे स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे मोठे केंद्र बनले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या अनेक खासगी संस्था पुण्यात आहेत. मात्र, त्या वसतिगृहाची सुविधा देत नाहीत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी विद्यार्थी करत असतात. त्यामुळे महाविद्यालये किंवा विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळत नाही.

विद्यार्थी अनधिकृतपणे का राहतात?

– शिक्षण संपल्यानंतर आता कुठे राहायचे असा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो. अशावेळी पूर्वी राहात असलेल्या आपल्या वसतिगृहाचा आधार विद्यार्थी घेतात.

– पुण्यात दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा ओघ वाढतो आहे. मात्र, त्याप्रमाणात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी पुरेशा आणि परवडतील अशा सुविधा उपलब्ध नाहीत.

– विद्यापीठाच्या वसतिगृहाचे शुल्क हे मुळातच कमी असते. नियमित राहणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर अनधिकृतपणे राहणारे विद्यार्थी हे शुल्क वाटून घेतात. त्यामुळे खर्च आणखी कमी होतो.

– ग्रंथालय, जेवणाची सुविधाही वसतिगृहाच्या जवळपास सहज उपलब्ध होते. त्यामुळेही नियमितपणे प्रवेश मिळाला नाही, तर अनधिकृतपणे राहण्यासाठी विद्यार्थी तयार होतात.

– सुटीच्या काळात अभ्यास करण्यापुरती राहण्याची सुविधा उपलब्ध होत नाही.

 परिणाम काय?

काही वेळा परवडेल असा दुसरा पर्यायच नसल्यामुळे विद्यार्थी अनधिकृतपणे वसतिगृहावर राहतात. प्रामाणिकपणे अभ्यास करण्यासाठी राहणारे विद्यार्थी असतात, त्याचप्रमाणे गुंडागर्दी करणारे विद्यार्थीही असतात. या विद्यार्थ्यांची नोंदच नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. वसतिगृहाला पुरवण्यात येणाऱ्या पाणी, वीज यांसारख्या सुविधांवरही ताण येतो.

 विद्यापीठाकडून कारवाई काय?

‘विद्यापीठातील वसतिगृहांची विद्यापीठाकडून पाहणी करण्यात येते. गेल्यावर्षी कारवाईची मोहीम विद्यापीठाने केली होती. त्याचे चित्रीकरणही करण्यात आले होते. यावर्षीही परीक्षा संपल्या की अशी मोहीम राबवण्यात येणार आहे. वसतिगृहांच्या आवाराच्या भिंतींची उंची वाढवणे, सीसीटीव्हींची संख्या वाढवणे असे उपायही करण्यात येत आहेत.’

– डॉ. बी. आर. शेजवळ, वसतिगृह प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ