मराठवाडय़ात दुष्काळाची स्थिती भीषण असताना पुणे जिल्हा व एकूणच पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची स्थिती हळूहळू गंभीर होत असल्याने सुमारे सात जिल्ह्य़ातून पुणे शहरामध्ये येणाऱ्या पालेभाज्या व फळभाज्यांच्या उत्पादनात लक्षणीयरीत्या घट होत आहे. त्यामुळे भाज्यांची आवक घटत असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर भडकले आहेत. किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे दर दुप्पटीपेक्षा अधिक, तर फळभाज्यांचा किलोचा दर साठ ते सत्तर रुपयांच्याही पुढे गेला आहे. पुढील पंधरा दिवसात या दरांमध्ये आणखी वाढ होणार असल्याची शक्यता बाजारातून व्यक्त करण्यात येत असल्याने पुणेकरांचे स्वयंपाकघरातील नियोजन आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
मराठवाडय़ात प्रामुख्याने लातूर जिल्ह्य़ामध्ये पाण्याअभावी दुष्काळाने भीषण रूप धारण केले आहे. पाण्याचा हा प्रश्न हळूहळू इतर विभागातही जाणवू लागला आहे. पुण्याच्या घाऊक बाजारांमध्ये पुणे जिल्ह्य़ासह सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, नाशिक आदी जिल्ह्य़ांतून त्याचप्रमाणे परराज्यातूनही भाज्यांची आवक होत असते. या सर्वच जिल्ह्य़ांमध्ये, भागांमध्ये सध्या कडक उन्हाळ्याची स्थिती व पाण्याची कमतरता जाणवत असल्याने भाज्यांच्या उत्पादनामध्ये घट होत चालली आहे. परराज्यातून येणाऱ्या भाज्यांचे प्रमाणही घटले आहे. परिणामी पुणे शहरात येणाऱ्या पालेभाज्या व फळभाज्यांचे प्रमाणही घटले आहे. आवक वाढली की दर कमी व आवक घटली की दरवाढ या बाजारातील सूत्रानुसार मागील काही दिवसांपासून भाज्यांच्या दरांचा आकडा वाढतच चालला आहे.
पाण्याच्या कमतरतेचा पहिला फटका पालेभाज्यांना बसला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात आता अभावानेच पालेभाज्या दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच दहा रुपयांना मिळणारी पालेभाज्यांची जुडी आता वीस ते पंचवीस रुपयांवर पोहोचली आहे. पुण्यात किरकोळ बाजारामध्ये विभागानुसार वेगवेगळे दर असल्याचेही दिसून येत आहे. शहराच्या मध्य वस्तीमध्ये फळभाज्यांचे किलोचे दर ६० ते ७० रुपये आहेत. येरवडा, गोखलेनगर, हडपसर, कात्रज, सिंहगड रस्ता आदी भागात ७० ते ८० रुपये, तर कोथरूड, शिवाजीनगर, लष्कर भागात भाज्यांचे किलोचे दर ९० ते १०० रुपयांवर पोहोचले आहेत. सध्या आवक होत असलेल्या भाज्या विविध प्रयोगशील शेतकऱ्यांच्या पाणी योजनांच्या माध्यमातून येत आहेत. मात्र, या पाण्यालाही काही दिवसात मर्यादा येणार आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर वाढतच जाणार असून, दर कमी होण्यासाठी पावसाशिवाय पर्याय नसल्याची सद्यस्थिती आहे.

‘‘भाज्यांची आवक घटत असल्याने दर वाढत चालले आहेत. पाण्याची कमतरता असल्याने काही शेतकऱ्यांकडून ठिबक सिंचनचा वापर करण्यात येत आहे. काही ठिकाणी शेततळ्यांच्या माध्यमातून भाज्यांचे उत्पन्न घेतले जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना भाज्या उपलब्ध आहेत. मात्र, आवक घटतच असल्याने पुढील पंधरा दिवसात भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाऊस होईपर्यंत भाज्यांचे दर कमी होऊ शकणार नाहीत.’’
– विलास भुजबळ,
भाज्यांचे घाऊक व्यापारी