दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. नवे सत्ताधारी येतात. मात्र पुणेकरांना घराबाहेर पाऊल ठेवल्यावर भेडसावणाऱ्या समस्या जुन्याच राहतात. शहर स्मार्टवगैरे होताना.. पुणेकर जीव मुठीत घेऊनच रस्त्यांवर वावरतात. स्वच्छतागृहांच्या मूलभूत सुविधेची वानवा आणि अगदी रस्ता ओलांडण्यासाठीही लागणारा तासभर वेळ.. अशा वरकरणी छोटय़ा, साध्या दिसत असल्या तरी मनस्ताप देणाऱ्या अनेक गोष्टी पुणेकर रोज सहन करत आहेत. लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी विविध ठिकाणी फिरून केलेल्या पाहणीतून रोजच्या समस्यांचे गंभीर चित्र उभे राहिले. पुण्याच्या नवनिर्वाचित महापौरांना पुणेकरांकडून ही आव्हाने..

  • विनाशुल्क स्वच्छतागृहांमध्ये घाण आणि दरुगधी

घरातून बाहेर पडल्यानंतर महिलांना स्वच्छतागृहात जाण्याची वेळ आलीच तर त्यांनी काय करायचे, या प्रश्नाला शहरातील अनेक रस्त्यांवर तूर्त काहीही उत्तर नाही. महिला स्वच्छतागृहांची संख्या मुळातच कमी असून त्यातही बहुसंख्य विनाशुल्क सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था कुणीही आत जाऊ शकणार नाही, अशीच असल्याचे ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाहणीत समोर आले.

शहरातील प्रचंड गर्दीच्या रस्त्यांवर आणि प्रमुख रस्त्यांवर महिला स्वच्छतागृहांची संख्या तोकडी असल्याचे वारंवार समोर आले आहे. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता या सर्वच ठिकाणी ही परिस्थिती दिसते. काही ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत, परंतु ती मुख्य रस्त्यांवर नव्हे, तर आतील गल्ल्यांमध्ये असल्यामुळे बऱ्याचशा महिलांना त्याची माहितीच नसल्याचे दिसून येते. तसेच एखाद्या स्वच्छतागृहानंतर रस्त्याच्या पुढच्या मोठय़ा टप्प्यात पुन्हा स्वच्छतागृहाची सोय नसल्याचे दिसून आले. सुलभ शौचालये सशुल्क असल्यामुळे त्यांची स्थिती बरी आहे. परंतु गर्दीच्या रस्त्यांवर महिलांची वर्दळही मोठी असल्यामुळे सशुल्क स्वच्छतागृहांपुढे रांगाच दिसून येतात. अनेक विनाशुल्क स्वच्छतागृहे मात्र आत पायही ठेवू नये इतकी घाण आहेत. शहराच्या विविध भागांतील काही विनाशुल्क स्वच्छतागृहांची पाहणी केली असता पाण्याची सोय नसल्यामुळे झालेली घाण आणि प्रचंड दरुगधी हीच प्रमुख समस्या दिसली, तर काही स्वच्छतागृहे बंदच असल्याचे दिसून आले. पाणी असले तर पाणी टाकण्यासाठी भांडी नाही किंवा पाण्याचे नळच गायब झाले आहेत, असेही दिसून आले. अनेक ठिकाणी विजेच्या दिव्यांचीही सोय नसल्यामुळे संध्याकाळनंतर महिला आत जाऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. डेक्कन भागातील एका स्वच्छतागृहाचा दुपारच्या वेळी चक्क कपडे धुण्यासाठी वापर होताना पाहायला मिळाला.