शहरात दिवसेंदिवस वाढत जाणारी खासगी वाहने, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी व एकूणच शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडण्याचे एकमेव कारण शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसणे, हेच असल्याचे ठाम मत ‘वनराई’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात अभ्यासक व नागरिकांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे ‘पीएमपी’च्या एकूणच कारभारावर या वेळी हल्लाबोलच करण्यात आला.
‘पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था-सद्य:स्थिती आणि भविष्यातील संधी’ या विषयावर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘वनराई’ चे अध्यक्ष मोहन धारिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, पीएमपीचे मुख्य अभियंता सुनील बुरसे, सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल राठी यांनी सहभाग घेतला.
धारिया म्हणाले, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर सर्वाधिक भर दिला गेला पाहिजे. ग्रामीण भागात रोजगार नसल्याने लोक शहरात येतात. त्यातून शहरातील लोकसंख्या वाढते आहे. त्याबाबत काही उपाययोजना करता येतील का, याचाही विचार होणे गरजेचे आहे.
पांढरे म्हणाले, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हेच वाहतुकीच्या समस्येवर उत्तर आहे. पर्याय नसल्याने नागरिकांकडून खासगी वाहने घेतली जातात. महिन्याला पुण्यात नवी २७ हजार वाहने येतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली, तर अनेक प्रश्न सुटतील.
वेलणकर म्हणाले, की सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याचे आश्वासन सर्व पक्ष देतात, पण ठोस काही होत नाही. पालिकांनी त्यांचा तीन टक्के, तर राज्य शासनानेही काही निधी सार्वजनिक वाहतुकीसाठी राखीव ठेवला पाहिजे. बससेवेबरोबरच रेल्वेच्या मार्गावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. राठी म्हणाले, की कमी अंतराचे भाडे कमी ठेवले पाहिजे. त्यातून प्रवासी संख्येत वाढ होईल. पीएमपीच्या ताफ्यातील सहाशे बस मार्गाबाहेर आहेत. त्या मार्गावर आणण्यासाठी ठोस उपाय व्हावेत.
पीएमपीची बाजू मांडताना बुरसे म्हणाले, दुरुस्तीचे साहित्य व त्यासाठीचा निधी वेळेवर मिळत नसल्याने साडेतीनशे ते चारशे बस रोज बंद असतात. डेपो वाढविण्यासाठीही पैसे नाहीत. रोज दहा लाखांची तूट आहे. विद्यार्थी मोफत पासचे दीडशे कोटी रुपये पालिकेकडून येणे आहे. येत्या डिसेंबपर्यंत भाडेतत्त्वावर ६६० बसेस सुरू केल्या जातील. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या माध्यमातून हजार बसेस मिळण्याची शक्यता आहे.
वनराईचे श्रीराम गोमरकर यांनी प्रस्ताविक केले.
‘अनधिकृत वाहतुकीकडे कानाडोळा करावा लागतो’
हिंजवडी आयटी पार्क भागात जाण्यासाठी वाकडपासून सक्षम सार्वजनिक वाहतुकीची यंत्रणा नाही. पर्याय नसल्याने अनधिकृत वाहतुकीतून प्रवास केला जातो. अशा वेळी या वाहतुकीकडे कानाडोळा करावा लागतो, अशी कबुली वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी केले. रस्त्यावरील दुहेरी पार्किंगबाबत ते म्हणाले, की पार्किंगच्या जागेवर स्थानिक किंवा व्यापाऱ्यांच्या गाडय़ा असल्याने बाहेरून येणाऱ्यांना पार्किंगसाठी जागा नसते. महात्मा गांधी रस्त्यावरही हे दिसून येते. इमारतीत पार्किंगचा गैरवापर करून काही ठिकाणी व्यवसाय केला जातो, हे तपासण्यासाठी व स्थानिकांच्या गाडय़ांच्या पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करण्याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाशी पत्रव्यवहार केला आहे.