पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेसची सेवा ११ नोव्हेंबरपासून पूर्ववत होणार आहे. खंडाळा घाटक्षेत्रातील दुरुस्तीच्या कामांसाठी या गाडीची सेवा बंद करण्यात आली होती.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खंडाळा घाटक्षेत्रामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याचप्रमाणे दोन वेळा मालगाडी रुळावरून घसरण्याचे प्रकार झाले होते. या दरम्यान दोन ते तीन वेळेत काही दिवस पुणे-मुंबई वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून घाटक्षेत्रामध्ये लोहमार्ग मजबुतीकरण आणि विविध तांत्रिक कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने विविध गाडय़ा बंद ठेवण्यात येत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून प्रगती एक्स्प्रेस विविध टप्प्यात बंद ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे मुंबईच्या सहा गाडय़ा पुण्यातूनच सोडण्यात येत होत्या. त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रगती एक्स्प्रेस आता ११ नोव्हेंबरपासून पूर्ववत होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला १० नोव्हेंबपर्यंत कर्जत स्थानकावर एक मिनिटांचा थांबा देण्यात आल्याचेही मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.