चित्रकार हा मनस्वीपणे काम करतो असे म्हटले जाते. हे काम स्वान्तसुखाय असले तरी आपण घडविलेल्या कलाकृती कोणी तरी पाहाव्यात अशी त्याची मनीषा असते. जलरंग, तैलरंग, ड्रायपेस्टल, अॅक्रॅलिक, पेपर कोलाज, छायाचित्रण, टेराकोटा आणि काचेच्या बरण्यांवरील रंगकाम अशा विविध माध्यमांतून साकारलेल्या नावीन्यपूर्ण ‘कलाकृती’ रसिकांना एकाच छताखाली पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विविध माध्यमांत काम करणाऱ्या बारा कलाकारांच्या कलाकृतींचे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
कलाछाया संस्थेच्या दर्पण कला दालनामध्ये बुधवारपासून (१० फेब्रुवारी) १६ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनातील कलाकृती पाचशे ते पाच हजार रुपयांच्या किमतीमध्ये रसिकांना खरेदी करता येणार आहेत. आपल्या घरातील दृश्यसौंदर्याची मेजवानी असलेल्या या कलाकृतींचा समावेश असलेले प्रदर्शन पाहताना रसिकांना आनंद देतील, अशा कलात्मक पद्धतीने त्या घडविण्यात आल्या आहेत.
चित्रकार सतीश घाटपांडे यांच्या पेपर फोल्डमधील कलाकृती, दिलीप ठकार यांच्या टेराकोटामधील नावीन्यपूर्ण आणि कलात्मक वस्तू, पतंजली पुरी यांनी पेपर कोलाजमध्ये घडविलेली चित्रे, गौरी पायगुडे यांनी तैलरंगामध्ये चितारलेली स्त्री विषयावरील चित्रे, हेमंत पायगुडे यांनी टिपलेली राजस्थानातील जीवन उलगडणारी छायाचित्रे, नीलम पनवार यांनी अॅक्रॅलिक माध्यमात केलेली राजस्थानातील फुले आणि निसर्गचित्रे पाहता येतील. वीणा सहस्रबुद्धे यांनी काचेच्या आणि चिनी मातीच्या बरण्यांवर केलेल्या मनमोहक रंगसंगतीतील कलाकृतींसह ईशान क्षीरसागर, संदीप यादव, सचिन नाईक, प्रशांत पाटील आणि डॉ. शिरीष धारप यांची जलरंगातील ग्रामीण भागातील वास्तवचित्रे, निसर्गचित्रे आणि जुन्या वस्तूंचा संग्रह हे सारे या प्रदर्शनातून रसिकांना अनुभवता येणार आहे.