अकरावीत शिकणाऱ्या ‘त्या’ मुलीचा तिच्या आई-वडिलांनी विवाह ठरविला. अल्पवयीन असणाऱ्या मुलीने विवाहास नकार देऊन शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या पालकांनी तिचा छळ सुरू केला. अखेर त्या मुलीने पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षात धाव घेऊन स्वत:चा विवाह रोखला.
पुण्यातील मंगळवार पेठेत राहणारी ही मुलगी एका महाविद्यालयात अकरावीत शिकायला आहे. तिचे वडील रिक्षाचालक आहेत. आई-वडील, आजी-आजोबा आणि काकासोबत ती राहते. तिचे चुलत आजी-आजोबा परिसरात राहायला आहेत. ही मुलगी अभ्यासातदेखील हुशार आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तिचा एका पंचवीस वर्षांच्या मुलासोबत विवाह करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. तिने विवाह करण्यास नकार दिला. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला धमकाविले. एवढेच नव्हे तर तिचे मनपरिवर्तन करण्यासाठी तिला एका देवॠषीकडे नेले. त्यानंतर तिच्या वडिलांनी महाविद्यालयात जाणाऱ्या मुलीचा पाठलाग सुरू केला. ज्या मुलासोबत तिचा विवाह ठरविण्याचा घाट घातला होता त्याच्याशी मोबाईलवरून बोलण्याची सक्ती केली.
तिने चुलत आजी-आजोबांकडे या घटनेची वाच्यता केली. त्यांनीही तिच्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु वडिलांनी एक-दोनदा तर मुलीला रस्त्यातच मारहाण केली. हा सगळा प्रकार असह्य़ झाल्याने तिने सामाजिक कार्यकर्त्यां प्रणीती जगताप यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या माध्यमातून पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. महिला साहाय्य कक्षाच्या पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांना या प्रकाराविषयी माहिती दिली. पोलीस निरीक्षक जोशी यांनी तिला धीर दिला आणि तिच्या आई-वडिलांना पोलीस आयुक्तालयात बोलावून घेतले. अल्पवयीन मुलीचा विवाह केल्यास कायद्यात अटक होण्याची तरतूद आहे, याची जाणीव तिच्या पालकांना करून दिली. पालकांना तंबी दिल्यानंतर त्यांचे परिवर्तन झाले. तिच्या नियोजित पतीशी पोलीस निरीक्षक जोशी यांनी संपर्क साधला आणि त्याला गुरुवारी (२१ जानेवारी ) पोलीस आयुक्तालयात हजर होण्याची सूचना केली.
दरम्यान, पोलिसांनी धीर दिल्याने आपल्याला बळ मिळाले. आपल्याला पुढे शिकायचे आहे, असे त्या मुलीने सांगितले.