भूमिगत वाहिन्या उद्ध्वस्त

शहरात गेल्या तीन महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आलेल्या पुराचा मोठा फटका भूमिगत वाहिन्यांनाही बसला आहे. सांडपाणी वाहिन्या, पावसाळी गटारे, जलवाहिन्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले असून पावसाळी गटारांसह विविध प्रकारच्या वाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने आराखडा केला आहे. या कामांसाठी तब्बल ३२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे पावसाचा महापालिकेला ३२५ कोटींचा फटका बसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

२५ सप्टेंबर आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातील काही दिवस शहराला जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यापूर्वीही वेळोवेळी मोठा पाऊस झाला होता. ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. विशेषत: आंबिल ओढय़ाला आलेल्या पुरामुळे मोठय़ा प्रमाणावर वाताहत आणि जीवितहानी झाली. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच पुराचा फटका भूमिगत वाहिन्यांनाही बसल्याचे पुढे आले आहे.

शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर महापालिकेने सातत्याने ओढे, नाले, पाणी साचणारी ठिकाणे यांचे सर्वेक्षण आणि पाहणी करण्याचे निश्चित केले. त्यानुसार भूमिगत वाहिन्यांची तपासणी महापालिकेकडून करण्यात आली. त्यामध्ये भूमिगत वाहिन्या उद्ध्वस्त झाल्याचे वास्तव पुढे आले. त्यामुळे या वाहिन्यांच्या दुरुस्तीचा प्राथमिक आराखडा करण्याचे काम महापालिकेकडून  हाती घेण्यात आले असून त्यासाठी किमान २५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पावसाळी गटारे, सांडपाणी वाहिन्यांबरोबरच जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे महापालिकेला मोठय़ा प्रमाणावर करावी लागणार आहेत. महापालिकेने केलेल्या पाहणीमध्ये सहा किलोमीटर लांबीच्या सांडपाणी वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी लागणार असल्याचे दिसून आले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने रस्त्याच्या कडेला बांधलेल्या पावसाळी वाहिन्या, गटारांमधील यंत्रणाही पूर्णपणे कोलमडली आहे. सुमारे २९ हजार ६६५ मीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्या पुरामुळे पूर्णपणे बाधित झाल्या आहेत. त्यांचीही तातडीने दुरुस्ती करावी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अनेक ठिकाणी अतिक्रमणांमुळे आंबिल ओढा आक्रसला आहे. त्यामुळे ओढा वाहत असलेल्या परिसरातील चाळीस ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला आहे. आंबिल ओढय़ालगत आवश्यक कामे करण्याचा आराखडा महापालिकेकडून तयार करण्यात आला असून त्यासाठी सत्तर कोटींचा खर्च अपेक्षित आहे. भविष्यात पूरपरिस्थिती टाळण्यासाठी  सीमाभिंती बांधणे, कल्व्हर्टची बांधणी आणि अन्य कामे करण्याचे प्रस्तावित आहे.

प्रायमूव्ह संस्थेकडून सर्वेक्षण

पुराची कारणे शोधण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रायमूव्ह या संस्थेला काम देण्यात आले आहे. ड्रोनने सर्वेक्षण करून आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. या आराखडय़ात काही उपाययोजनाही प्रस्तावित करण्यात येणार आहेत.

पावसामुळे भूमिगत वाहिन्यांना फटका बसला आहे. प्रायमूव्ह संस्थेकडून त्याबाबत सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याबरोबरच वाहिन्या दुरुस्तीचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. हा आराखडा ३२५ कोटींचा असून त्याअंतर्गत विविध कामे होणार आहेत. मात्र पावसाळी गटारे, सांडपाणी वाहिन्या आणि जलवाहिन्या दुरुस्तीसाठी तातडीने ५० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

– व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभाग प्रमुख