लवकरच कामाला प्रारंभ; नदीच्या २५ मीटर खोलीवर मेट्रो मार्गिका

शेतकरी महाविद्यालय ते स्वारगेटपर्यंतची भूमिगत मेट्रो मार्गिका नदीपात्राखालून जाणार आहे. मेट्रो मार्गिकेची खोली जमिनीच्या २५ मीटर खाली इतकी आहे. येत्या काही दिवसांत महामेट्रोकडून नदीच्या खालून जाणाऱ्या कामाला प्रारंभ होणार आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेपैकी शेतकी महाविद्यालय ते स्वारगेट हा भूमिगत मार्ग असणार आहे. या भूमिगत मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी  ५.१९ किलोमीटर आहे. या मार्गात शिवाजीनगर बसस्थानक, जिल्हा आणि सत्र न्यायालय, फडके हौद, मंडई आणि स्वारगेट ही भूमिगत स्थानके असणार आहेत. शेतकी महाविद्यालयापासून पुढे स्वारगेटपर्यंत जाणाऱ्या भूमिगत मेट्रो मार्गाचे काम जलदगतीने होण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून मोठे खड्डे (शाफ्ट) खोदण्याचे काम सुरू केले आहे. जमिनीखाली १८ ते २० मीटर खोलीवर जाण्यासाठी ६०० ते ८०० मीटर रॅम्प तयार करण्याची प्रक्रिया महामेट्रोकडून सुरू करण्यात आली आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले आहे. त्यामुळे टप्पाटप्प्याने कामांचे नियोजन महामेट्रोकडून करण्यात आले आहे. नदी खालून जाणाऱ्या मार्गातील कामेही येत्या काही महिन्यांत सुरू होणे अपेक्षित आहे.

शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गिकेसाठी दोन टप्प्यात निविदा प्रक्रिया मागविण्यात आल्या होत्या. शिवाजीनगर (शेतकी महाविद्यालय) ते बुधवार पेठ (फडके हौद चौक) स्थानकापर्यंतचा पहिला टप्पा हा अडीच किलोमीटर लांबीचा आहे. त्यामध्ये शिवाजीनगर ते धान्य गोदाम या दोन भुयारी स्थानकांचा समावेश आहे. फडके हौद ते स्वारगेटपर्यंतच्या भूमिगत मार्गिकेसाठी स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यातील शेतकी महाविद्यालय ते फडके हौद या कामाला सुरुवात होणार आहे.

११२३ कोटी रुपये खर्च

* भूमिगत मेट्रोसाठी दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. नव्या अद्ययावत तंत्रज्ञानानुसार टनेल बोअरिंग मशिनद्वारे (टीबीएम) बोगद्यांची निर्मिती केली जाणार आहे.

* या दोन बोगद्यांची एकूण लांबी ७.४८ किलोमीटर अशी असणार असून कामासाठी ११२३ कोटी रुपये खर्च येणार आहे.

* या भूमिगत मेट्रोचे वैशिष्टय़ म्हणजे नदीखालून मेट्रो मार्गिका फडके हौदापर्यंत जाणार आहे. शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय येथे दोन भूमिगत स्थानके उभारण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेअंतर्गत शेतकी महाविद्यालय ते स्वारगेट हा भूमिगत मार्ग आहे. भूमिगत मार्गिकेसाठी महामेट्रोकडून मोठे खड्डे (शाफ्ट) आणि उतार (रॅम्प) तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.