पौड रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या पादचारी भुयारी मार्गाचा वापर कोणीही करत नसताना याच रस्त्यावर सुमारे सव्वासहा कोटी रुपये खर्च करून आणखी दोन पादचारी भुयारी मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी एकमताने मंजुरी देण्यात आली. हे दोन्ही प्रस्ताव बैठकीत आयत्या वेळी दाखल करण्यात आले व त्यांना लगेच मंजुरीही देण्यात आली.
स्थायी समितीमध्ये झालेल्या या निर्णयाची माहिती समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोथरूडमधील करिष्मा सोसायटीजवळ एक भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव होता. त्याला तीन कोटी ८८ लाख रुपये खर्च येणार आहे. तर दुसरा भुयारी मार्ग प्रभाग क्रमांक ३४ पौड रस्ता येथे आनंदनगर चौकात बांधण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी दोन कोटी ६१ लाख रुपये एवढा खर्च येणार असून चालू अंदाजपत्रकात या कामासाठी एक कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे प्रस्ताव मंजूर झाले असले, तरी या मार्गावर पादचाऱ्यांची खरोखर संख्या किती, या मार्गाची आवश्यकता किती आहे, याचा कोणताही तपशील देण्यात आलेला नाही.
हे दोन्ही प्रस्ताव मंजूर झालेले असले, तरी त्यात देण्यात आलेली माहिती ढोबळ स्वरूपाचीच आहे. मुख्यत: ठेकेदाराने हे काम किती कालावधीत पूर्ण करायचे आहे याचाच उल्लेख दोन्ही विषयपत्रांमध्ये नाही. याबाबत विचारले असता कर्णे गुरुजी म्हणाले, की आम्ही ढोबळ स्वरूपातील तपशील तपासले आहेत. मात्र संबंधित कामाचे सविस्तर तपशील व अन्य माहिती देणे हे प्रशासनाचे काम आहे. भुयारी मार्गाचा वापर होत नसतानाही हा खर्च कशासाठी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
शहरातील अनेक भुयारी मार्ग खर्चापुरतेच
शहरात अनेक ठिकाणी पादचारी भुयारी मार्ग बांधण्यात आले असून त्यावर महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत. मात्र त्यातील बहुतांश मार्गाचा वापर पादचारी करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या मार्गाची सद्य:स्थिती पाहता नव्या पादचारी भुयारी मार्गाचा वापर किती होईल याबाबत शंका आहे. मात्र तरीही दोन नव्या भुयारी मार्गाना मंजुरी देण्यात आली आहे.