‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’मधील विजेते सूरज, प्रियांका यांची भावना
‘मला काय वाटते, मला काय म्हणायचे आहे हे व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. त्याचबरोबर आपले म्हणणे मांडण्यासाठी ‘ब्लॉग’सारख्या नव्या माध्यमाचा पर्याय मिळाला आणि त्याचा प्रभावही लक्षात आला,’ अशा भावना ‘ब्लॉग बेंचर्स’नी व्यक्त केल्या. ‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा पुण्यातील सूरज यादव आणि द्वितीय क्रमांक मिळवणारी प्रियांका चव्हाण यांना सोमवारी पारितोषिक देण्यात आले. या वेळी सूरज आणि प्रियांका यांनी या भावना व्यक्त केल्या.
‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’ या स्पध्रेत ‘पर्यावरणाच्या बैलाला..’ या अग्रलेखावर राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले होते. त्यामध्ये पुण्यातील गेनबा सोपानराव मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयातील सूरज यादव याला प्रथम क्रमांक तर आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या प्रियांका चव्हाण हिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या समारंभात सिम्बॉयोसिस महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. बीना इनामदार यांच्या हस्ते सूरजला सात हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख यांच्या हस्ते प्रियांका हिला पाच हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
या वेळी सूरज म्हणाला, ‘मी शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. आठवडय़ातील चार दिवस मी शेती करतो. त्यामुळे आताचा विषय मला खूप जवळचा वाटला. मला लिहायला आवडते. मात्र मी नव्या माध्यमांचा किंवा तंत्राचा वापर लिखाणासाठी करत नव्हतो. या स्पर्धेमुळे ‘ब्लॉग’ या माध्यमाची ओळख झाली. मी बक्षिसासाठी सहभागी झालो नव्हतो. ते मिळाले त्याचा आनंदच आहे. मात्र बक्षिसाची रक्कम मी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देऊ इच्छितो.’
प्रियांका म्हणाली, ‘मला वाचायला आणि लिहायला आवडते. लोकसत्ता विचारांना चालना देतो. आपले म्हणणे मांडायची संधी मिळणे, आपण योग्य दिशेने विचार करतो का याची पारख होणे, त्याचबरोबर आपल्या म्हणण्यावर इतरांना काय वाटते हे लगेच कळणे यासाठी ब्लॉग या माध्यमाचा पर्याय मला आवडला. या पुढेही या उपक्रमांत भाग घेऊन व्यक्त व्हायला आवडेल.’