साधेपणाच्या गणेशोत्सवात कलाकारांवर बेरोजगारीची वेळ

पुणे : करोना संकटामुळे यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याच्या निर्णयामुळे ‘निर्मितीचे डोहाळे लागलेले देखणे हात’ म्यान झाले आहेत. उत्तम देखावे साकारून गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेणारे कलाकार आणि त्यांच्यासमवेत काम करणारे सुतार, रंगारी, हलत्या देखाव्यांसाठी मूर्ती साकारणारे कारागीर आणि विद्युत रोषणाईची कामे करणारे इलेक्ट्रिशियन अशा सर्वावर बेरोजगारीची वेळ आली आहे.

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या निर्णयामुळे गणेश मंडळांची सजावट ही मोठी बाजारपेठ ठप्प झाली आहे. अवघ्या २१ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवामध्ये आपले आर्थिक संकट गणराय दूर करतील अशी अपेक्षा बाळगून असलेले कलाकार आता उपजीविकेसाठी छोटी-मोठी कामे करण्याकडे वळले आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची भव्य सजावट साकारण्यामध्ये किमान ७५ कलाकारांचे योगदान असते. देखावा साकारण्यासाठी ४५ सुतार, १५ रंगारी तीन पाळ्यांमध्ये कार्यरत असतात. देखाव्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर विद्युत रोषणाईचे काम करण्यासाठी १५ इलेक्ट्रिशियन काम करतात. या सर्वावर यंदा करोना संकटामुळे निवांत बसण्याची वेळ आली आहे, अशी माहिती विवेक खटावकर यांनी दिली.

अखिल मंडई मंडळाची सजावट साकारणारे विशाल ताजणेकर यांनी टाळेबंदी लागू झाल्यापासून मी गावाकडेच वास्तव्यास असल्याचे सांगितले. मंडळाच्या समाज मंदिरामध्येच गणेशोत्सव साधेपणाने होणार असल्याने यंदा देखावा साकारण्यात येणार नाही. माझ्यासमवेत ३० ते ४० जण काम करतात. माझ्याकडेच काम नाही तर त्यांना मी कोणता आधार देणार, असा प्रश्न ताजणेकर यांनी उपस्थित केला. देखावे साकारण्यासाठी सामान ठेवले जाते त्या गोदामाचे भाडे देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, असे संदीप गायकवाड यांनी सांगितले. दरवर्षी मी नवग्रह मंडळ, खडकमाळ आळी मित्र मंडळ आणि हनुमान मित्र मंडळाचे देखावे करतो. गणेशोत्सवामध्ये माझ्याकडे किमान दहाजण काम करतात. सध्या गणेश मंडळांची मूर्ती रंगविण्याचे काम करणे सुरू केले आहे. मात्र, जेमतेम किराणा माल भरता येईल एवढेच पैसे मिळतील, असे गायकवाड यांनी सांगितले. ‘आपण साकारलेली कला पाहण्यासाठी कोणी येणारच नाही’ ही व्यथा कोणत्याही कलाकाराला अस्वस्थ करून सोडणारी असते. त्याचा अनुभव यंदाच्या गणेशोत्सवामध्ये आला आहे, असे छत्रपती राजाराम मंडळाची सजावट करणारे अमन विधाते यांनी सांगितले. माझ्याकडे राज्यभरातील २० गणेश मंडळांच्या सजावटीचे काम असते. ७०० ते ८०० कलाकार काम करतात. माझ्याकडेच काम नसल्याने सहकाऱ्यांना मी काम देऊ शकत नाही, याची खंत वाटते, असे विधाते यांनी सांगितले.

वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले

गणेशोत्सवामध्ये देखावे साकारून मिळणाऱ्या पैशांतून वर्षभराची बेगमी होत असते. करोना संकटामुळे काम नसल्याने वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे प्रसिद्ध मूर्तिकार सतीश तारू यांनी सांगितले. पुण्यासह राज्यभरातील ३० ते ३५ मंडळांसाठी पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक हलते देखावे मी साकारतो. गेल्या वर्षी सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये पूर परिस्थितीमुळे तर या वर्षी करोनामुळे  परिस्थिती संकटाची झाली आहे. करोना राज्यभर पसरला असल्याने हरित भागातील गणेश मंडळांसाठी  देखावे साकारावेत असा विचार करता येत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.