महापालिका शिक्षण मंडळाने ७७ हजार विद्यार्थ्यांच्या सहलींचे आयोजन करताना केलेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश अखेर महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. यासंबंधीची सर्व कागदपत्रे व माहिती सादर करण्याचे आदेश मंडळाला देण्यात आले असून त्याप्रमाणे मंडळाकडून ही माहिती महापालिकेला सादर करण्यात आली आहे.
शिक्षण मंडळाकडून सहलींचे आयोजन करताना अनेक नियमबाह्य़ प्रक्रिया करण्यात आल्याची लेखी तक्रार स्वयंसेवी संस्थांनी आयुक्तांकडे केली आहे. या तक्रारीची दखल घेण्यात आली असून महापालिकेच्या दक्षता विभागाचे प्रमुख, उपायुक्त सुधाकर देशमुख यांनी सहलीसाठी काढण्यात आलेल्या निविदा तसेच अन्य कागदपत्रे मागवून घेतली आहेत. या सहलींबाबत तक्रार झाल्यानंतर सहल आयोजनात त्रुटी राहिल्याचे मंडळानेही मान्य केले आहे. निविदा प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या, त्या पुढील वर्षी दूर केल्या जातील व तेव्हा चुका होणार नाहीत असे आता मंडळाचे म्हणणे आहे.
मंडळातर्फे यंदा या सहलींवर तब्बल दोन कोटी २६ लाख रुपयांचा खर्च होणार असून विद्यार्थी सहलीच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी, त्यांच्याशी संबंधित संस्थांना सहल आयोजनाची कामे देण्यात आली. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हॉटेल तसेच रिसॉर्टमध्येच या सहली काढण्यात आल्याचे उघड झाले आहे. एकेका ठिकाणी तीन-तीन हजार विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेण्यात आले होते. त्यामुळे या सर्व सहल आयोजनाची चौकशी करण्याची मागणी विजय कुंभार, मंगेश तेंडुलकर, सूर्यकांत पाठक, विवेक वेलणकर, विश्वास सहस्त्रबुद्धे, जुगल राठी यांनी केली आहे.