मंगळवारी पुण्याच्या मोहम्मदवाडी भागात एका ट्रॅक्टरवरून खाली पडून चाकाखाली चिरडले गेल्यामुळे एका ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव नंदा यादव असून त्या मोहम्मदवाडीतील तारावडे वस्ती येथील रहिवासी होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी दुपारी नंदा यादव त्यांचा पती अशोक घरामध्ये स्लॅबच्या कामासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी गेले होते अशी माहिती वानवडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

“मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांनी खरेदी केलेले सामान ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरले आणि अशोक यांनी नंदा यादव यांना ट्रॅक्टरमध्ये बसून येण्यास सांगितले. अशोक यांनी त्यांच्या मागे बाईकवरुन येण्याचा निर्णय घेतला. नंदा यादव या ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या सीटवर बसल्या होत्या. मोहम्मदवाडी पोलिस चौकीमागील रस्त्यावरील भागात चढ असल्याने ट्रॅक्टरचा वेग कमी झाला आणि चालकाने त्यावेळी अचानक गीअर बदलल्यामुळे ट्रॅक्टरला जोरात धक्का बसला. या धक्क्यामुळे नंदा यादव यांनी आपला तोल गमावला आणि त्या खाली पडल्या आणि ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली आल्याने त्या चिरडल्या गेल्या,”अशी माहिती उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवाळे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव यांनी पावसाळ्यामुळे घराजवळ स्लॅबचे काम काढले होते. त्यामुळे वाळू, विटा आणि इतर साहित्य घेण्यासाठी पत्नी नंदा यांच्यासह हडपसर येथे गेले होते. सामान नेण्यासाठी त्यांनी एक ट्रॅक्टर भाड्याने घेतला. त्यावेळी अशोक यांनी तू ट्रॅक्टरमध्ये जा मी पाठीमागे बाईकवर येतो असे सांगितले. नंदा यादव चालकाशेजारी बसलेल्या असताना चढ असलेल्या रस्त्यावर अचानक ट्रॅक्टरचा वेग कमी झाला आणि चालकाने घाईमध्ये गीयर बदलला. त्यामुळे जोरात धक्का बसला आणि नंदा या खाली पडल्या. तितक्यात त्यांच्या अंगावारुन ट्रॅक्टरचे चाक गेले आणि त्या चिरडल्या गेल्या.