भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेदरम्यान, मी असेपर्यंत खुशाल गायी कापा असं वक्तव्य केल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भातली एक व्हिडीओ क्लीपही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. आता या विधानावरून त्यांनी माफी मागायला हवी, अन्यथा भाजपाकडून त्यांची हकालपट्टी व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी दानवे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. तसेच, दानवे यांच्या या वक्तव्याविरोधात गुरूवारी आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. गो-हत्येसंदर्भात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह असून, त्यांनी यासाठी माफी मागावी, असे ते म्हणाले आहेत.

यावेळी मिलिंद एकबोटे म्हणाले की, गायीला विसरून विकास म्हणजे विनाशाला निमंत्रण ठरणारे आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी गो-मातेला कत्तलखान्यात पाठवणाऱ्या, प्रत्येक नेत्याला अडवण्याची गो-रक्षकांची भूमिका आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

गो-हत्येला प्रोत्साहन देणारं वक्तव्य त्यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने करणं अपेक्षित नव्हतं. संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्याबद्दल नाराजी आहे. संतापाची भावना आहे. त्यामुळेच रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही उद्या आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाची माहिती देण्यासाठीच आज पत्रकारपरिषदेचे आयोजन केले आहे. शांततामय निदर्शनं हे आंदोलनाचं स्वरूप असणार आहे. आमचं असं मत आहे की, कुठल्याही प्रवृत्तीच्या, विचाराच्या विरोधात लढलं पाहिजे. दानवे जर मुस्लीम तुष्टीकरणासाठी गो-हिताला तिलांजली देत असतील, पक्षाचा अजेंडा विसरत असतील, तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी कोणती भूमिका घ्यायची हे ते ठरवतील. परंतु एक समाजाचा घटक म्हणून गो-मातेचा भक्त म्हणून आमची देखील काही कर्तव्य आहेत. या भूमिकेतून आम्ही दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करतो. दानवे यांनी वक्तव्य मागे घेतलं पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे, अन्यथा पक्षाने त्यांना काढून टाकलं पाहिजे. असं एकबोटे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.