देशातील शिक्षणाची पुढील दिशा ठरवणाऱ्या नव्या शिक्षण धोरणाबाबत सर्वंकष चर्चा ‘लोकसत्ता विश्लेषण’ या कार्यक्रमात होणार आहे.

केंद्रीय पर्यावरण, माहिती आणि प्रसारणमंत्री मंत्री प्रकाश जावडेकर यांचा सहभाग असलेला हा वेब संवाद गुरुवारी (१० सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

केंद्र सरकारने नुकतीच नव्या शिक्षण धोरणाला मान्यता दिली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे धोरण तयार केले आहे. काळानुरूप आवश्यक असलेल्या बदलांचा या धोरणात समावेश करण्यात आला आहे. तसेच शिक्षणातील पारंपरिक चौकटी मोडून शिक्षक, विद्यार्थ्यांना मोकळीक देण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन अभ्यासक्रम, संशोधनावर भर, आंतरविद्याशाखीय शिक्षण, कौशल्य विकास, अभ्यासक्रमांतील बदल यावर या धोरणात भर देण्यात आला आहे. या सर्वच मुद्यांच्या अनुषंगाने ‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. नव्या धोरणामागील विचार, अंमलबजावणी या अनुषंगाने जावडेकर भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे शिक्षण तज्ज्ञ, अभ्यासक, शिक्षण क्षेत्राशी संबंधित स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, पालक यांना शिक्षण धोरण समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल.

कार्यक्रमात सहभागासाठी https://tiny.cc/LS_Vishleshan_10Sep येथे नोंदणी आवश्यक.