केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (शुक्रवार) पुण्यातील टांगेवाला कॉलनी येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाग्रस्तभागास भेट दिली. यावेळी त्यांनी येथील नागरिकांची देखील चौकशी केली. अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता १८ झाला आहे. तर अद्यापही सातजण बेपत्ता आहेत.

यावेळी आठवले म्हणाले की, आचारसंहितेमुळे राज्य सरकारला मदतीची घोषणा करता येत नाही. मात्र, आपत्कालीन परिस्थितीमध्ये जी काय मदत करता येते ती प्रशासनाकडून केली जात आहे.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचे टाळल्याबद्दल बोलताना आठवले यांनी सांगितले की, शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांची चौकशी करणे योग्य नाही असे अण्णा हजारे यांनी देखील सांगितले आहे. त्यामुळे ईडीने पवारांची चौकशी करू नये असे माझे मत आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बेफाम पावसाने हाहाकार उडवून दिला. शहरामध्ये सहकारनगर, अरण्येश्वर भागात टांगेवाला कॉलनीत एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळून एकाच ठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाला. सहकारनगर भागात वीर सावरकर सोसायटीत पाण्याच्या लोंढय़ात बंगल्याची भिंत कोसळली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. सिंहगड रस्ता भागात एक दुचाकीस्वार महिला आणि मोटारचालक बांधकाम व्यावसायिक मोटारीसह वाहून गेले. केळेवाडी पुलावरून एक मोटार पाण्यात   वाहून गेली. ती गुरुवारी संध्याकाळी नाल्यामध्ये सापडली. मात्र, त्यातील तीन तरुण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कात्रज येथील स्मशानभूमीजवळ पाण्यात वाहून आलेल्या मोटारीत एकाचा मृतदेह सापडल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. टांगेवाला वसाहतीतील गंगातीर्थ सोसायटीतील सीमाभिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेला बांधकाम व्यावसायिक जबाबदार असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सीमाभिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने सीमाभिंत कोसळल्याचा रहिवाशांनी आरोप केला आहे.