लग्न म्हटलं की पाहुणे मंडळींचा लवाजमा आलाच. मग यांच्या सत्कारासाठी हार तुरे,श्रीफळ, फेटे, टॉवेल-टोपी हे सर्वच त्याच्यात आले. पण पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या मेहेत्रे कुटुंबीयांनी मुलाच्या लग्नात पाहुणे मंडळींना चक्क पेरुची रोप वाटली आणि समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला.

जुन्नर तालुक्यातील म्हेत्रे कुटुंबाच्या घरातील अक्षय संजय म्हेत्रे याच्या लग्नामध्ये मंगळवारी आगळे वेगळे चित्र पाहायला मिळाले. लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींचे मान-पान स्वागत हार-तुरे, श्रीफळ, टॉवेल-टोपी, फेटे देऊन करण्या ऐवजी म्हेत्रे कुटुंबीयांनी पेरूची रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. अक्षय संजय म्हेत्रे आणि पूजा रसाळ हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. या दोघांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी १० जुलैला म्हेत्रे कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात केशरी आंब्यांची रोपटे विवाहास आलेल्या मंडळींना दिले होते. या आगळा-वेगळ्या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केल्याचे पाहायला मिळाले होते. ‘मन की बात’ या कार्यक्रमातून मोदी यांनी या म्हेत्रे कुटुंबियांच्या विवाहसोहळ्यातील उपक्रमाचा उल्लेख केला होता.

म्हेत्रे कुटुंबीयांनी मुलाच्या लग्नात तब्बल ४ हजार पेरूची रोपे विवाहासाठी आलेल्या मंडळींना दिली. ही रोपे राजेश घुमटकर यांनी योग्य दारात देत त्यांनी एक प्रकारे साथच दिली म्हणावी लागेल. या आगळ्यावेगळ्या भेटीने विवाहसोहळ्यात एक वेगळे पणा जाणवत होता. गेल्या वर्षी ५ हजार केशरी आंब्यांची रोपे वाटली होती. नारायण गाव येथे पार पडलेल्या या विवाह सोबतच आमच्याकडे जे काही कार्यक्रम असतील त्या दिवशी आम्ही असा उपक्रम राबवणार असल्याचे अक्षयच्या काकांनी सांगितले. लग्न समारंभात मानपानावर लाखो आणि कोटी रुपये खर्च करण्याऐवजी म्हेत्रे कुटुंबीयांनी पेरूची रोप वाटत त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. पण समाजानं यातून काही धडा घेतला आणि सर्व लग्न समारंभात हेच चित्र दिसलं तर म्हेत्रे कुटुंबीयांनी सुरु केलेला हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी म्हणावा लागेल.