पिंपरी : पिंपरीच्या उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाचे स्थलांतर गेल्या वर्षी मोशी येथील प्रशस्त इमारतीमध्ये झाले. या इमारती जवळच्या पडीक मोकळ्या जागेचा योग्य वापर करून तेथे उद्यान विकसित करण्याचा निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून घेतला. त्यानुसार येथे विविध फळ झाडांसह, शोभेच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. उद्यानात सुंदर हिरवळही तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे हे उद्यान साकारल्याची भावना मनात ठेवून कर्मचाऱ्यांनी या उद्यानाला ‘आनंदवन’ असे नाव दिले आहे.

पिंपरी आरटीओचे कार्यालय पूर्णानगर चिखली येथील भाडय़ाच्या इमारतीमध्ये सुरू होते. नवनगर विकास प्राधिकरणाने दिलेल्या जागेत आरटीओची इमारत मोशी येथे बांधण्यात आली. त्या नवीन प्रशस्त इमारतीमध्ये गेल्यावर्षी आरटीओ कार्यालयाचे कामकाज सुरू झाले. कामकाज सुरू झाल्यानंतर इमारतीमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या. अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून हळूहळू सुविधा उपलब्ध करून देत कामकाज सुरळीत करण्यात आले.

नव्या इमारतीच्या समोर दहा ते पंधरा गुंठे जागा रिकामी होती. या ओसाड माळरानावर उभ्या राहिलेल्या इमारतीच्या जवळ उद्यान नव्हते तसेच पाण्याची सुविधाही चांगल्या प्रमाणात उपलब्ध नव्हती. त्याही परिस्थितीतून मोकळ्या जागेमध्ये उद्यान फुलविण्याचा निर्णय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कर्मचारी, अधिकारी यांनी काही रक्कम जमा केली आणि लोकसहभागातून काही मदत गोळा करून उद्यान विकसित करण्यात आले.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्या प्रेरणेमुळे उद्यान साकारले या भावनेतून या उद्यानाला ‘आनंदवन’ असे नाव देण्यात आले आहे. आरटीओ कार्यालयातील या उद्यानामध्ये पेरू, आंबा, नारळ यासह इतर काही फळझाडे, तसेच शोभेची झाडेही मोठय़ा प्रमाणात लावण्यात आली आहेत. हिरवळ विकसित केल्यामुळे आरटीओ कार्यालयातील वातावरण आल्हाददायक बनले आहे. या उद्यानासाठी काही दानशूर नागरिक पाण्याचा पुरवठा करतात. उद्यानातील स्वच्छताही केली जाते.

कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्याने आणि लोकसहभागातून उद्यान तयार करण्यात आले आहे. पाण्याची समस्या असली, तरी लोकांचा सहभाग घेऊन पाणी पुरविले जात आहे. उद्यानामुळे कार्यालयाच्या आवारातील प्रसन्नता वाढत आहे.

 – आनंद पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी