News Flash

हत्ती गणपती, नातूबाग मंडळाचा मंडप खड्डेविरहित

गणेशोत्सव म्हणजे मांडव आणि मांडव म्हणजे रस्त्यांवर खड्डे हे ठरलेले चित्र आहे.

हत्ती गणपती, नातूबाग मंडळाचा मंडप खड्डेविरहित
बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मंडळातर्फे दरवर्षी खड्डेविरहित मंडप उभा केला जातो.

गणेशोत्सव म्हणजे मांडव आणि मांडव म्हणजे रस्त्यांवर खड्डे हे ठरलेले चित्र आहे. महापालिका प्रशासनाचा भर रस्त्यांवर खड्डे पडू नयेत यावर असतो. त्यातून प्रशासन आणि मंडळांमध्ये वादही होतात. मंडप उभारण्यासाठी रस्त्यांवर खड्डे घेतले जातात. उत्सवानंतर मात्र ते खड्डे बुजवले जात नाहीत. असे चित्र एकीकडे असले, तरीही पुण्यातील सदाशिव पेठेतील येथील हत्ती गणपती मंडळ आणि बाजीराव रस्त्यावरील नातूबाग ही दोन मोठी व प्रसिद्ध मंडळे गेल्या काही वर्षांपासून आवर्जून खड्डेविरहित मांडव उभारत आहेत.

हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष शाम मानकर मंडळाच्या निर्णयाबद्दल म्हणाले, की आमच्या मंडळातर्फे खड्डेविरहित मांडव उभारण्यात येतो. यंदाचे तिसरे वर्ष आहे. हा मांडव वीस फूट रुंद व वीस फूट लांबीचा असून तो उभारण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च येतो.

या मांडवामुळे निश्चितच खर्चात वाढ होते. मात्र, अशा प्रकारचा मांडव आरामदायी असतो. या मांडवांचे माप, मोजणी, उभारणी उत्कृष्ट होते. खड्डेविरहित मांडवांची अधिक वजन पेलण्याची क्षमता असते का, असा प्रश्न अनेक मंडळांना असतो. परंतु हा मांडव गणेश मूर्ती, देखावे यांचे वजन सहज पेलू शकतो. या मांडवांमध्ये अचूकता असते. आमच्या मंडळाचा मांडव कातुरे मांडववाले यांच्याकडून उभारण्यात येतो.

छोटय़ा मंडळांना आणि ज्यांचा छोटा मांडव असतो त्यांना हा मांडव घालणे शक्य नाही. कारण वीस फूट लांब व वीस फूट रुंद अशा आकाराचा मंडप उभा करावा लागतो.

त्यापेक्षा लहान मांडव असेल तर खड्डेविरहित मांडव घालणे शक्य होत नाही. तसेच पुण्यातील मंडप व्यावसायिकांकडे अशा प्रकारचे मंडप खूपच कमी आहेत. त्यामुळे जरी मागणी असली, तरी तसा पुरवठा होणे आवश्यक आहे. पुण्यात खड्डेविरहित मांडवांना खूपच कमी मागणी आहे. हत्ती गणपती मंडळातर्फे दरवर्षी अशाच प्रकारचा मांडव घालण्यात येणार आहे, असेही मानकर यांनी सांगितले.

नातूबाग मंडळ

नातूबाग मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे म्हणाले, की पंधरासोळा वर्षांपूर्वी पुण्यात महापालिका आणि नागरिकांकडून उत्सवात मांडवांमुळे खड्डे पडल्याच्या कारणावरून खूपच वाद व टीका झाली होती. त्या वेळी मंडळांनी पुढाकार घेऊन मुख्य रस्त्यांवर खड्डा करायचा नाही, असा निर्णय घेतला. प्रशासन व महापालिकेने खड्डेविरहित मांडव घालण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी मंडळांनी केली होती. मात्र, या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही. बाजीराव रस्त्यावर चार गणपती मंडळे आहेत. त्यातील नातूबाग मंडळाचा देखावा पाहण्यासाठी गर्दी खूप होते. हा रस्ता रहदारीचा असल्याने मांडव घालण्याची परवानगी पाच दिवस आधी मिळते आणि उत्सवानंतर चार दिवसांत मांडव काढावा लागतो. म्हणजे उत्सवाचे दिवस विचारात घेता फक्त वीस दिवसांसाठी परवानगी मिळते. मात्र, इतर मंडळांचे मांडव उत्सवाच्या आधी दीड-दीड महिना उभारले जातात. त्यांना कोणीच काही बोलत नाही. अशा अनेक अडचणी असल्याने खड्डेविरहित मांडव घालण्याचा निर्णय आमच्या मंडळाने घेतला.गेल्या सोळा वर्षांपासून आमचे मंडळ खड्डेविरहित मांडव घालीत आहे. मंडळाच्या वर्गणीतून आणि गोखले मांडववाले यांच्या सहकार्याने हा मांडव घालण्यात येतो. मंडळाने खड्डेविरहित मांडवाचे स्ट्रक्चर तयार केले आहे. गोखले मंडप आणि कंपनीचे मालक पंत गोखले यांनी सोळा वर्षांपूर्वी यासाठी मदत केली. एकही खड्डा न घेता मांडव घालण्याची गोखले यांची कला आहे. त्याला मंडळाने एक पाऊल पुढे टाकून खर्च करून तयार स्ट्रक्चर केले. सोळा वर्षांपासून तेच वापरले जात आहे. स्ट्रक्चर कायमस्वरूपी असल्याने कामगारांची मजुरी आम्ही देतो. गोखले आमच्या मंडळाचे सदस्य असल्याने ते कमी खर्चात मांडव उपलब्ध करून देतात. मंडळाचा चोवीस फूट रुंद व सव्वीस फूट लांब या आकाराचा मांडव असून दरवर्षी सुमारे एक लाख वीस हजार खर्च येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 1:57 am

Web Title: unique ganesh decoration in pune
Next Stories
1 नाटय़गृहांच्या दुरवस्थेस जबाबदार कोण?
2 मराठा-दलितांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न-मेटे
3 ..त्यावेळी मी निवडणूक लढविणार नाही – राजू शेट्टी
Just Now!
X