विद्यार्थ्यांकडून निर्मिती

पुणे : संसर्गाचा धोका पत्करून करोनाबाधितांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी मॅजिक बॉक्स ही अनोखी कल्पना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात आणली आहे. या मॅजिक बॉक्सचा वापर डॉक्टरांनी रुग्ण तपासणीसाठी के ल्यास त्यांना रुग्णांपासून सुरक्षित अंतर ठेवणे शक्य होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युके शन सोसायटीच्या अल्लाना वास्तुरचना महाविद्यालयातील श्रेयांस चोरडिया आणि प्रावेश मेहता या विद्यार्थ्यांनी हा मॅजिक बॉक्स तयार के ला आहे. करोना विषाणू संसर्गाच्या काळात डॉक्टर सातत्याने करोनाबाधितांच्या संपर्कात येत असल्याने त्यांनाही संसर्गाचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर करोना रुग्णांची तपासणी, त्यांच्यावर उपचार करताना या मॅजिक बॉक्सचा वापर के ल्यास सुरक्षित अंतर राखले जाऊन रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात थेट संपर्क येत नाही. रुबी हॉल, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, औंध येथील जिल्हा रुग्णालय, नायडू रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, सह्य़ाद्री रुग्णालय अशा काही रुग्णालयांना हा मॅजिक बॉक्स देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.