बाळासाहेब जवळकर

स्मार्ट सिटीचा विषय असो किंवा शास्तीकराची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा असो, विरोधकांनी सातत्याने आंदोलने सुरू ठेवली आहेत. मात्र भाजपविरोधातील ही एकजूट कामापुरती आणि तात्पुरती आहे.

पिंपरी महापालिकेचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता, तेव्हा  एकहाती सत्तेमुळे राष्ट्रवादीचे महापालिकेतील नेते बऱ्यापैकी उन्मत्त झाले होते. त्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात इतर पक्ष एकत्र आले होते, त्यामुळे राष्ट्रवादी विरोधात सर्व, असे चित्र शहरात बराच काळ  होते. कालानुरूप राजकीय परिस्थिती बदलली आणि आता भाजप विरूद्ध सर्व जण असे चित्र दिसू लागले आहे.

महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे जे भाजप नेत्यांच्या मनात येते, ते रेटून मार्गी लावण्याचे काम केले जात आहे. या कारभारामुळे अनेकांची विविध प्रकारची गणिते मोडून पडताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध आंदोलने करून विरोधकांनी भाजपविरोधी वातावरण तयार केले आहे. स्मार्ट सिटीचा विषय असो किंवा शास्तीकराची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा असो, विरोधकांनी सातत्याने आंदोलने करून भाजपला चांगलीच डोकेदुखी दिली आहे.

सोमवारी त्यांनी गाजर आंदोलन केले. जसजसे निवडणुकांचे वातावरण तापू लागेल, तशी परिस्थिती बदलू लागेल. कारण, प्रत्येकाचे राजकीय कार्यक्रम वेगळे आहेत. परिणामी एका मांडवाखाली नांदणे विरोधकांना अवघड जाणार आहे. त्यामुळे भाजपविरोधातील ही एकजूट कामापुरती आणि तात्पुरती आहे.