सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आवार सध्या टवाळखोरीने ग्रस्त असून, विद्यार्थ्यांना मारहाण होणे, सायंकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. अशा दंगा करणाऱ्या टोळ्यांवर काहीच नियंत्रण राहिलेले नाही. असे असताना आपापसातील वादामुळे काही कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवण्याची वेळ विद्यापीठ प्रशासनावर आली आहे.
गेल्या आठवडय़ात विद्यापीठातील विद्यार्थ्यांला रात्री मारहाण करण्याचे दोन प्रकार घडले. त्याबाबत पोलिसांकडेही तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही दुसऱ्या एका विभागातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशीच घटना घडली. अधिसभेच्या पहिल्या दिवशीही रस्त्यावरून जाणाऱ्यांना त्रास देणाऱ्या टोळक्याला विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेने पकडले होते. या प्रकारानंतरही विद्यापीठाच्या आवारात बिनबोभाटपणे सुरू असणाऱ्या या दंगेखोरीला आळा घालण्यास विद्यापीठ प्रशासन पुरे पडत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. सायंकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक विद्यापीठाच्या आवारात फिरायला येतात, विद्यापीठात चालणाऱ्या या टवाळीखोरीचा त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मोठे हॉर्न वाजवत गाडय़ांवरून भरधाव जाणे, मुलींची छेड काढणे, येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना गाडीवरून जाताना टपली मारणे असा दंगा करणाऱ्या टोळ्या आवारात फिरत असतात, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. अगदी रात्रीच्या वेळीही बाहेरील मुलांकडून त्रास होत असल्याची तक्रार वसतिगृहातील विद्यार्थ्यांची आहे. विद्यापीठाच्या काही भागांमध्ये रात्रीच्या वेळी दारू पाटर्य़ा चालतात. बाहेरील टोळ्या येऊन विद्यापीठाच्या आवारात दंगा करत असतात, असे विद्यार्थ्यांचेही म्हणणे आहे.
एकीकडे विद्यापीठाच्या मोठय़ा आवाराच्या सुरक्षेसाठी पुरेसे सुरक्षा रक्षक नाहीत. एवढय़ा मोठय़ा आवाराची सुरक्षा राखायची कशी, बाहेरून येणाऱ्यांवर नियंत्रण कसे ठेवायचे, विद्यापीठाची अंतर्गत सुरक्षा कशी राखायची, असे प्रश्न विद्यापीठ प्रशासनाला भेडसावत आहेत. मात्र, त्याचवेळी विद्यापीठाचे कर्मचारी, अधिकारी यांच्या आपापसातल्या वादामुळे त्यांना एकेक स्वतंत्र सुरक्षा रक्षक देण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. काही दिवसांपूर्वी एक माजी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात वाद झाला. त्यानंतर अधिकाऱ्यासाठी एक स्वतंत्र सुरक्षा रक्षक विद्यापीठाला द्यावा लागला. त्यापूर्वीही संघटनांतील आपापसातील वादामुळे विद्यापीठातील अधिकाऱ्यांना स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था देण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे.
‘‘विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या. मात्र, एक घटना विद्यापीठाच्या आवारात घडली नसल्याचे समजते. विद्यापीठाच्या सुरक्षेची संपूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना यापुढे अशाप्रकारच्या कोणत्याही घटनांना सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. त्याबाबत सुरक्षाव्यवस्थेशी चर्चा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये.’’
– डॉ. नरेंद्र कडू, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ