आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरण; अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना आता २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरण करून विद्यापीठाने आरोग्य सुविधांसाठी खासगी रुग्णालयांना सोबत घेतले आहे. अद्ययावत आरोग्य केंद्राचे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात उद्घाटन करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे नियोजन आहे.

विद्यापीठाच्या परिसरात जवळपास १० हजार विद्यार्थी, प्राध्यापक-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्राथमिक उपचार केले जातात. मात्र, आरोग्य केंद्रात अद्ययावत सोयीसुविधा, यंत्रणा नसल्याने तातडीच्या वेळी बाहेरच्या खासगी रुग्णालयात नेऊन खासगी उपचार करण्याचे प्रसंग गेल्या काही काळात आले होते. त्यामुळे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. विद्यापीठ प्रशासनाने त्या बाबत वेळोवेळी आश्वासने दिली होती. मात्र, त्याची पूर्तता होत नसल्याने सातत्याने त्या बाबत विचारणा केली जात होती. अखेरीस आरोग्य केंद्राच्या सक्षमीकरणासाठी विद्यापीठाने पाऊल टाकले. आरोग्य केंद्रासाठी दीड कोटीची तरतूद करण्यात आली. त्यातील ५० लाख रुपये अत्याधुनिक उपकरणांसाठी आहेत.

‘प्राथमिक उपचारांची सुविधा आरोग्य केंद्रात उपलब्ध होती, मात्र आधुनिक यंत्रणा निर्माण करण्याची आणि २४ तास सेवा मिळण्याची मागणी केली जात होती.  आता मोठय़ा उपचारांव्यतिरिक्त आरोग्य सेवेसाठी बाहेरच्या रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज नाही,’ असे विद्यापीठाचे आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत दुधगावकर यांनी सांगितले.

आरोग्य केंद्रातील अद्ययावत सुविधा

* पेशंट मॉनिटर

*  बेडची व्यवस्था

*  पोर्टेबल व्हेंटिलेटर

* ईसीजी यंत्रणा

* ऑक्सिजन

* रुग्णवाहिका

आता विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात ‘रुबी’चे डॉक्टर आणि परिचारिका २४ तास उपलब्ध असतील. तसेच विद्यापीठाच्या परिसरात राहणारे विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी-त्यांच्या कुटुंबीयांना दंतवैद्यक सेवा देण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील दंतवैद्यक रुग्णालयाच्या माध्यमातून सुविधा पुरवली जाणार आहे.

-डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ