पतीसोबत भांडण करुन गावाला निघालेल्या महिलेचं चार महिन्यांचं बाळ एका महिलेने पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंजू देवीदास मोरे वय २२ असं या महिलेचं नाव असून तिने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अहमदनगर येथील लोणी येथे राहणार्‍या मंजू देविदास मोरे यांच मंगळवारी पती सोबत भांडण झालं. त्यानंतर मंजू यांनी सातारा येथे गावी जाण्याचा निर्णय घेतला. अहमदनगरवरुन त्या साताऱ्याकडे जाणार्‍या एसटीमध्ये बसल्या. या प्रवासादरम्यान मंजू यांची एका महिलेशी गप्पांमधून ओळख झाली. या महिलेनेही बोलण्यामधून मंजू यांचा विश्वास संपादन केला.

यावेळी बोलत असताना मंजू यांनी सदर महिलेला आपल्या पतीसोबत झालेल्या भांडणाविषयी सांगितलं. यावेळी महिलेने एसटी स्वारगेट स्टँडला पोहचल्यावर मंजु यांना आपल्या घरी येण्याचा प्रस्ताव दिला. हडपसर भागात दोन्ही महिला एका चायनिज हॉलेटमध्ये जेवायला गेल्यावर मंजू यांनी आपल्या बाळाला थोड्यावेळासाठी आरोपी महिलेकडे सोपवलं. यावेळी महिलेने संधी साधत मंजू यांची नजर चुकवत त्या ठिकाणावरुन पोबारा केला.

आपल्या बाळाला घेऊन गेलेली महिला बराच वेळ झाला तरी दिसली नाही म्हणून मंजू यांनी शोध सुरु केला. पण बराच वेळ शोध घेऊनही आपलं बाळ सापडत नसल्याने अखेरीस मंजू यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरु असल्याची माहिती उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.