पिंपरी-चिंचवड परिसरातील देहूरोडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. देहूरोडमध्ये अज्ञात व्यक्तींनी दोन एटीएम केंद्र आणि दुचाक्यांची तोडफोड केली आहे. परिसरात अशा घटना वाढत असताना पोलीस मात्र मूग गिळून गप्प आहे.

पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांची काही दिवसांपूर्वीच देहूरोडला बदली झाली. ते अगोदर मंचर येथे कार्यरत होते. कार्यभार स्वीकारताच त्यांनी हुक्काबारवर धडक कारवाई केली होती. परंतू, परिसरातील गुन्हेगारी कृत्यांवर वचक निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहे.
हातात तलवारी घेऊन फिरणे, वाहनांची तोडफोड करणे, मारहाण या घटना वारंवार घडत आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास अबुशेठ रोडवर असलेल्या दोन दुचाक्यांची तोडफाड करत एटीएम केंद्राला टोळक्याने लक्ष केले. परिसरातील गुंडांच्या मनात पोलिसांविषयी भीती नसल्याचे यातून स्पष्ट होते. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. पोलिसांनी या भागातील गस्त वाढवून गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही तर देहूरोडचा बिहार होणार, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.