हिंगणघाटमधील मुलीबद्दल जे घडलं ते अतिशय वाईट वाटणारी गोष्ट आहे. तिने लढत लढत मृत्यूशी झुंज दिली. शेवटी माझ्या मनात हा प्रश्न पडला की अन्यायाविरोधात लढायला हा एकच मार्ग राहिला आहे का? की तुम्हाला मृत्यूशय्येवर लढावं लागतं. हा विषय हा इतका ज्वलंत आहे की, जोपर्यंत मानसिकतेत बदल होत नाही. तोपर्यंत याला आळा बसणार नाही, अशा नराधमांना २५ दिवसांत शिक्षा व्हावी,  असं काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी एमपीएससी स्टुंडट्स राईट्स या संस्थेच्यावतीने ‘संवाद – स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांना हिंगणघाट जळीतकांडाबद्दल बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, हिंगणघाटमधील मुलीबरोबर जे काही झालं ते अत्यंत वाईट वाटणारी गोष्ट आहे. तिने लढत लढत मृत्यूशी झुंज दिली. शेवटी माझ्या मनात हा प्रश्न पडला की अन्यायाविरोधात लढायला हा एकच मार्ग राहिला आहे का? की तुम्हाला मृत्यूशय्येवर लढावं लागतं. निर्भयाबाबत असेल, हिंगणघाटमधील मुलाबद्दल असेल किंवा हैदराबादमधील घडलेली घटना असेल. हा विषय हा इतका ज्वलंत आहे की, जोपर्यंत मानसिकतेत बदल होत नाही. तोपर्यंत याला आळा बसणार नाही. मला खरचं कधीकधी असं वाटतं की आपण का यावर फक्त प्रतिक्रिया देतो व विधानसभेत बोलतो. याबद्दल एक विधेयक पारीत झालं पाहिजे.

जर आरोपी रंगहाथ पकडला असेल तर मग लवकरात लवकर अशा प्रकरणांचा निकाल लागून त्याला शिक्षा झाली पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन असा कायदा पारीत करण्याचा निर्णय घेत आहोत. निर्भया प्रकरण किती लांबलं आहे, मात्र हा एक कायद्याचा भाग आहे. मला असं वाटतं की महिला अत्याचारासंबंधी असलेल्या ज्या प्रकरणातील आरोपी रंगेहाथ पकडले गेले आहेत, त्यांचा निकाल २० ते २५ दिवसांत व जिथे सिद्ध करावं लागत असेल त्या ठिकाणी ९० दिवसांत निकाल लागयला हवा. यासाठी आम्ही एकत्र येऊन विधेयक पारीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचही त्या म्हणाल्या.

विदर्भात हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रकार अतिशय संतापजनक असून या प्रकरणी अटकेत असलेल्या नराधमाला पोलीस तपासासह अन्य कायदेशीर बाबींमध्ये विलंब न लावता जलदगतीने शिक्षा होण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलावीत. किंवा हैदराबादेतील घटनेप्रमाणे या मारेक ऱ्याचा थेट ‘एन्काऊंटर’ करावा, अशी मागणी या अगोदर आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेली आहे.