28 February 2020

News Flash

शौचालयासमोरच बटाटा प्रतवारी

गुलटेकडीतील बाजार आवारात दररोज राज्य तसेच परराज्यातून बटाटय़ाची आवक होते.

गुलटेकडी मार्केटयार्डमधील प्रकार; कारवाईची मागणी

पुणे : गुलटेकडी मार्केटयार्डातील बाजारआवारात स्वच्छतागृहाच्या दारातच बटाटय़ाच्या गाडय़ांमधील माल उतरवून बटाटय़ांची निवडणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वच्छतागृहाजवळच हे काम केले जात असल्यामुळे या प्रकाराबाबत तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कोंडी, अस्वच्छता, गाळ्यांसमोर फळभाज्या लावून विक्री करणे असे प्रकार रोखण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यात येत असताना स्वच्छतागृहाजवळच बटाटय़ाच्या गाडय़ा लावून बटाटय़ाची निवडणी आणि त्यांचे प्रतवारीनुसार वर्गीकरण केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाजार समितीने अशा प्रकारांकडे काणाडोळा न करता कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बाजार आवारात सकाळी गर्दी असते. गर्दी ओसरल्यानंतर दुपारच्या वेळेत स्वच्छतागृहाजवळ बटाटय़ाच्या गाडय़ा लावून निवडणी केली जाते. बटाटा उतरवून घेणारे आडते बाजार समितीने आखून दिलेल्या नियमांना हरताळ फासत असल्याचे या प्रकारामुळे उघडकीस आले आहे.

गुलटेकडीतील बाजार आवारात दररोज राज्य तसेच परराज्यातून बटाटय़ाची आवक होते. बटाटय़ाचा हंगाम साधारणपणे दोन ते अडीच महिन्यांचा असतो. बटाटा काढणीनंतर अनेक राज्यांत बटाटा शीतगृहात ठेवून नंतर तो विक्रीसाठी पाठविला जातो. शीतगृहात आठ ते दहा महिने बटाटा ठेवण्यात येत असल्यामुळे तो खराब होण्याचे प्रमाण वाढते. शीतगृहातून बटाटा बाहेर काढल्यानंतर बाहेरील वातावरणाचा परिणाम होतो. एका गाडीत साधारणपणे वीस टन बटाटा बसतो. त्यापैकी पाच ते दहा टक्के बटाटा खराब असतो. बाजारात बटाटा दाखल झाल्यानंतर खराब किंवा कमी प्रतवारीचा बटाटा निवडण्यात येतो. चांगली प्रतवारी असलेल्या बटाटय़ाची विक्री केली जाते.

आरोग्याशी खेळ

काही आडते स्वच्छतागृहाच्या दारात बटाटय़ाची गाडी उतरवून घेतात. स्वच्छतागृहासमोरच बटाटा पसरवून ठेवला जातो. जमिनीवर बटाटा ठेवण्यासाठी पोत्यांचा वापरदेखील केला जात नाही. स्वच्छतागृहात बाहेर आलेल्या पाण्यामुळे  बटाटा खराब होण्याची शक्यता असते. हाच बटाटा विकण्यात येत असल्याने एकप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याची प्रतिक्रिया बाजार आवारात व्यक्त झाली. अशा आडत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बेकायदा गाळे बांधणी

बाजारात दररोज कांदा, बटाटय़ाची मोठी आवक होते. गाळ्यांवर जागा अपुरी पडत असल्याने तत्कालिन प्रशासक मंडळाने मार्केटयार्डातील प्रवेशद्वार क्रमांक चारजवळ कांदा बटाटा व्यापाऱ्यांसाठी तात्पुरती शेड बांधली होती. काहीजणांनी शेडमध्ये बेकायदा गाळ्यांची उभारणी केली आहे. परस्पर संमतीने गाळ्यांचे वाटपदेखील करण्यात आले.

First Published on January 22, 2020 3:38 am

Web Title: unloaded bulk potatoes near toilet door in market yard premises zws 70
Next Stories
1 विमानतळ कार्यालयात आवश्यक मनुष्यबळाची भरती
2 लोकजागर : बीआरटीला ब्रेक
3 विद्यापीठांची सामाजिक जबाबदारी निश्चित करण्याचा विचार
Just Now!
X