पिंपरीतील बेवारस वाहनांचा प्रश्न

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील बेवारस वाहनांचे पोलिसांनी सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षणात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक पोलिसांना केवळ ५९ बेवारस वाहने आढळून आली. सर्वेक्षण केलेल्या वाहनांमध्ये फक्त चारचाकी वाहनांचा समावेश आहे. केवळ वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या वाहनांचेच सर्वेक्षण पोलिसांनी केले. शहरामध्ये ठिकठिकाणी बेवारस पडलेल्या दुचाकी वाहनांना सर्वेक्षणातून वगळण्यात आल्यामुळे शेकडो बेवारस दुचाकींचा प्रश्न कायम आहे.

बेवारस वाहनांच्या बाबत २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना बेवारस वाहने हटविण्याबाबतचे आदेश दिले होते. महापालिका, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) आणि पोलिसांनी संयुक्तपणे बेवारस वाहने हटविण्याची कारवाई करावी असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षकांची पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केली. पिंपरी आयुक्तालयाच्या  हद्दीतील बेवारस वाहनांचे सर्वेक्षण करण्यास जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. रस्त्याच्या कडेला तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांचे पोलिसांनी सर्वेक्षण केले. सर्वेक्षण करताना वाहनांच्या क्रमांकावरून वाहन मालकांचा शोध घेऊन ती वाहने त्यांच्या ताब्यात देण्यात आली. ज्या वाहन मालकांचा शोध लागला नाही, अशी केवळ ५९ वाहने पोलिसांना आढळून आली.

सर्वेक्षणात आढळलेली बेवारस वाहने गोळा करून ती एका ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.  यासाठी वाहतूक पोलिसांनी पालिकेकडे जागेची मागणी केली आहे. पालिका आयुक्तांबरोबर त्यासाठी दोन बैठका झाल्या. आयुक्तांनी जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल. गोळा केलेली वाहने आरटीओ कार्यालयाकडून भंगारमध्ये काढून त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या आवश्यक धोरणात्मक निर्णयासाठी बैठक घेण्यात येणार आहे. पोलिसांनी केलेल्या बेवारस वाहनांच्या सर्वेक्षणातून दुचाकींना  वगळण्यात आल्यामुळे त्या ठिकठिकाणी धूळखात पडून आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणात ५९ चारचाकी बेवारस वाहने आढळून आली आहेत.    – अमरनाथ वाघमोडे, पर्यवेक्षण अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी