शासनाचा एखादा चांगला निर्णय अनेकांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरू शकतो. याचे एक उदाहरण नव्या वर्षांत शहरात अनुभवण्यास येणार आहे.. कित्येक वर्षे नूतनीकरण न झालेल्या रिक्षा परवान्यांची झाडाझडती घेण्याचे काम प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू असून, कोणीच वाली नसणारे रिक्षा परवाने शोधण्यात येत आहेत. हे परवाने काही दिवसांनी बेरोजगारांना देण्यात येणार असून, त्यातून अनेक बेरोजगारांना स्वत:चा व्यवसाय उपलब्ध होऊ शकणार आहे.
पुणे व पिंपरी- चिंचवड शहरामध्ये सुमारे ४५ हजार रिक्षा धावतात. दर पाच वर्षांनी रिक्षाच्या परवान्याचे नूतनीकरण करून घेणे गरजेचे आहे. मात्र काही रिक्षा परवान्यांचे अनेक वर्षे नूतनीकरणच होत नसल्याची बाब समोर आल्याने राज्य शासनाच्या परिवहन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार या रिक्षा परवान्यांची माहिती घेण्याचे काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. नूतनीकरण न झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करून घेण्यास डिसेंबर अखेपर्यंत मुदत देण्यात आली होती. नूतनीकरण न झालेल्या सुमारे दहा हजार रिक्षा परवान्यांमधून मुदतीच्या कालावधीत पाच ते सहा हजार रिक्षा मालकांनी नियमानुसार असलेला दंड भरून परवान्यांचे नूतनीकरण केले.
अंतिम मुदतीतही परवान्याच्या नूतनीकरणासाठी समोर न आलेल्या परवानाधारकांना शेवटची संधी देण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या परवानाधारकांना त्यांनी परवाना काढताना नोंदविलेल्या पत्त्यावर नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या नोटिसा म्हणजे परवाना नूतनीकरणाबाबतचा अंतिम आदेश आहे. नोटिसांनुसार नूतनीकरणासाठी येणाऱ्या परवाना धारकाला नूतनीकरण न केल्याबाबत कारणे द्यावी लागणार आहेत. संबंधिताचे कारण योग्य किंवा पटणारे असेल, तरच त्याच्या परवान्याच्या नूतनीकरणाचा विचार केला जाणार आहे.
परवान्यांबाबतच्या या प्रक्रियेमध्ये अनेक परवान्यांचे नूतनीकरण होण्याची शक्यता नाही. अनेक परवाने ‘डेड’ या अवस्थेत आहेत. ही प्रक्रिया १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर कोणीही वाली नसणारे परवाने दुसऱ्यांना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. रिक्षा परवान्याची मागणी करणाऱ्या बेरोजगारांना या रिक्षा परवान्यांची भेट देण्यात येणार आहे. त्यासाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.