व्हॉट्स अॅप, ट्विटर आदी समाजमाध्यमांमधून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या तसेच एखाद्या व्यक्तीविषयी बदनामीकारक मजकूर टाकणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस सरसावले आहेत. पुणे शहर पोलिसांपाठोपाठ पुणे ग्रामीण पोलीसही लवकरच सोशल मीडिया लॅब सुरू करणार आहेत.
मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावरील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सोशल मीडिया लॅब सुरू केली आहे. राज्यात सर्वाधिक सायबर गुन्हे मुंबई आणि पुणे शहरात दाखल होतात. पुणे शहर पोलिसांनी सोशल मीडिया लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच पुणे पोलीस आयुक्तालयात सोशल मीडिया लॅब सुरू होणार आहे. पुणे शहराच्या तुलनेत पुणे जिल्हय़ात सायबर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र ग्रामीण भागाचा विस्तार वाढला असून, सोशल मीडियावरील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडूनही सोशल मीडिया लॅब सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी ही माहिती दिली.
पाषाण रस्त्यावरील ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात ही लॅब सुरू करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर टाकल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह मजकुराची पडताळणी आणि विश्लेषण सायबर तंत्रज्ञांकडून या लॅबमध्ये केले जाणार आहे. आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास तो तातडीने काढून आक्षेपार्ह मजकूर पाठविणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. अफवा आणि आक्षेपार्ह मजकूर समाजात प्रसारित झाल्यास तेढ निर्माण होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडिया लॅब सुरू करणे गरजेचे ठरले आहे, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.
दहशतवादी कारवाया आणि सोशल मीडियावर प्रसारित केला जाणारा आक्षेपार्ह मजकूर याबाबत जागृती करण्यासाठी पुणे जिल्हय़ातील सायबर कॅफेचालकांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस ८६ सायबर कॅफेचालक उपस्थित होते. समाजात तेढ निर्माण करणारे मजकूर प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उरुळी कांचन, सणसवाडी, बारामती, तळेगाव दाभाडे येथे युवक मेळाव्यांचेही आयोजन करण्यात आले होते. गुंतवणुकीचे आमिष दाखविणारे संदेश वाचून नागरिकांनी बळी पडू नये, याविषयी देखील पोलिसांनी ग्रामीण भागात जनजागृती मोहीम हाती घेतली होती. ग्रामीण पोलिसांकडून दहशतवादाच्या विरोधातही जनजागृतीची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जिल्हय़ात जनजागृतिपर दहा हजार भित्तिपत्रके पोलिसांनी लावली होती.

बँकेतून मॅनेजर बोलतोय, तुमच्या एटीएमचा पीन क्रमांक द्या.. असे दूरध्वनी करून अनेक नागरिकांच्या खात्यातील रकमा लांबवण्याच्या घटना जिल्हय़ात घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी अनेक गावांमध्ये जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. उरुळी कांचन, सणसवाडी, बारामती, तळेगाव दाभाडे आदी अनेक गावांमध्ये हा उपक्रम करण्यात आला. पुढेही तो सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी दिली.